उल्हासनगरातील जनसंपर्क अधिकाऱ्याच्या दालनात वादग्रस्त दस्ताऐवज 

दिनेश गोगी
बुधवार, 30 मे 2018

उल्हासनगरमधील जनसंपर्क अधिकाऱ्याच्या दालनात महाराष्ट्र शासनाचे बनावट ओळखपत्र, रिमामे चेक, रबरी शिक्के, तसेच फाईली मिळाल्या आहेत. रजेवर जाताना आपल्या दालनाची चावी पालिकेत जमा करण्याऐवजी स्वतःसोबत नेण्याचा प्रकार जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांना भोवला आहे. 

उल्हासनगर - उल्हासनगरमधील जनसंपर्क अधिकाऱ्याच्या दालनात महाराष्ट्र शासनाचे बनावट ओळखपत्र, रिमामे चेक, रबरी शिक्के, तसेच फाईली मिळाल्या आहेत. रजेवर जाताना आपल्या दालनाची चावी पालिकेत जमा करण्याऐवजी स्वतःसोबत नेण्याचा प्रकार जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांना भोवला आहे. 

शिवसेना-रिपाइंने या प्रकाराची तक्रार केल्यावर 25 मे राजी बंद केलेले भदाणे यांचे दालन आज उघडण्यात आली आहे. त्यात चक्क महाराष्ट्र शासनाचे बनावट ओळखपत्र, काही रिकामे चेक, रबरी शिक्के आणि विविध खात्याच्या असंख्य फाईली मिळाल्याने उल्हासनगर महानगरपालिकेत गोंधल उडाला आहे. 

तत्कालीन आयुक्त निंबाळकर यांनी भदाणे यांच्याकडे विशेष कार्य अधिकारी अंतर्गत अतिक्रमण, शिक्षण, पाणी पुरवठा अशा अतिरिक्त पदांचा पदभार सोपवला होता. त्यामुळे, शासनाच्या वतीने प्रतिनियुक्तीवर आलेल्या गॅजेट ऑफिसरवर प्रथमच या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करण्याची नामुष्की ओढावली होती. या अनपेक्षित प्रकाराने भदाणेचा दबदबा निर्माण झाला होता. मात्र विशेष कार्य अधिकारी हे असंविधानिक पद असून कुठेही हे अस्तित्वात नाही अशी तक्रार शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव, नगरसेवक मनोज लासी, माजी नगरसेवक दिलीप मालवणकर यांनी पालिकेकडे केली होती. तर वणवा समता परिषदेचे अध्यक्ष निलेश पवार यांनी थेट राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती.

भदाणेबाबत वाढत असलेल्या तक्रारींची दखल घेऊन विद्यमान आयुक्त गणेश पाटील यांनी भदाणेकडील अतिरिक्त पदे काढून घेताना त्यांच्याकडे केवळ जनसंपर्क अधिकारी हे मूळ पद ठेवले होते. भदाणे यांच्याकडील अतिरिक्त पदभार काढून घेतला असला तरी त्यांच्या दालनात विविध खात्याच्या फाईली आहेत. त्या गायब होण्याची शक्यता असल्याने त्याचे दालन सिल करण्यात यावी अशी मागणी करण्यात आल्यावर 25 मे रोजी दालन सिल करण्यात आले. आज दुपारी आयुक्त गणेश पाटील, महापौर मीना आयलानी, मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर, सहाय्यक आयुक्त मनीष हिवरे, राजेंद्र चौधरी, भगवान भालेराव, मनोज लासी, मुख्य सुरक्षा अधिकारी बाळू नेटके यांच्यासमोर दालन उघडण्यात आले. विशेष म्हणजे 14 मे पासून  रजेवर असलेल्या भदाणे यांच्या ड्रायव्हरने ही चावी पालिकेत आणून दिली. यावेळी ड्रायव्हरचा जवाब पालिकेने नोंदवून घेतला आहे. 

याबाबत आयुक्त गणेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की या सर्व प्रकारची गांभीर्याने चौकशी केली जाणार आहे. मात्र या प्रकरणात भदाणे यांची बाजू देखील ऐकून घेतली जाणार असे सांगितले.

Web Title: Controversial documents in the public relations office in Ulhasnagar