'शिवसंपर्क' मोहिमेत नगरसेवक झाला आमदार!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील "शिवसंपर्क' मोहिमेला आमदाराने दांडी मारल्यामुळे डमी आमदार उभा करण्याची नामुष्की शिवसेनेवर ओढवली. उस्मानाबाद येथील चिखली गावात पिंपरीचे आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार आले नाहीत. त्यामुळे मुंबईतील माजी नगरसेवक यशोधर फणसे यांनाच आमदार म्हणून उभे करण्यात आले. आमदार समजून ग्रामस्थांनीही फणसे यांच्यासमोर आपली गाऱ्हाणी मांडली; मात्र प्रसिद्धिमाध्यमांनी हे उघड केल्यावर शिवसेना तोंडावर आपटली आहे.

ग्रामीण भागातील निवडणुकांमध्ये अपेक्षित यश न मिळाल्यामुळे ठाकरे यांनी सर्व मंत्री व आमदारांना गावाकडे जाण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी "शिवसंपर्क' मोहिमेची घोषणा करण्यात आली. ही मोहीम मराठवाड्यापासून सुरू झाली; मात्र ठाकरे यांनी स्वत: निवड केलेल्या 40 पैकी 27 आमदारांनी मोहिमेकडे पाठ फिरवली. यामुळे ठाकरे संतापलेले असतानाच डमी आमदाराचा प्रकार उघड झाला आहे.

चिखली या गावात शिवसेनेची ही मोहीम होती. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्याची जबाबदारी ऍड. चाबुकस्वार यांच्यावर होती. ते न आल्याने आयत्या वेळी फणसे यांनाच पुढे करून त्यांची आमदार म्हणून ओळख करून देण्यात आली. माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांनी फणसे यांच्याकडे बोट दाखवून "पक्षप्रमुखांनी आपल्याशी चर्चा करण्यासाठी आमदार चाबुकस्वार साहेबांना पाठवले आहे,' असे ग्रामस्थांना सांगितले. ग्रामस्थही आमदाराला ओळखत नसल्याने त्यांनी फणसे यांच्यासमोर गाऱ्हाणी मांडली. प्रसिद्धिमाध्यमांनी हा प्रकार उघड केल्यानंतर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवसेनेचे आमदारच मोहिमेचा फज्जा उडवत असल्याने ठाकरे यांना आता डोक्‍यावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे.

अहवाल मुंबईच्या नगरसेवकांचा!
या संपर्क मोहिमेचा अहवाल सादर करण्याचे आदेश ठाकरे यांनी दिले आहेत; मात्र आमदारच हजर राहत नसल्याने त्यांना अहवालही सादर करता आलेला नाही. मुंबईतून पाठवण्यात आलेल्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी औरंगाबाद येथे ठाकरे यांना अहवाल सादर केला आहे.

मुंबई

कल्याण: प्रत्येक माणसाच्या जीवनात वेळ मूल्यवान आहे. परंतु जीवन ही अमूल्य आहे, यामुळे प्रत्येकाने वाहन चालविताना नियमांचे...

09.24 AM

मुंबई : मंगळवारपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई शहरातील जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे. वाहतूक सेवा मोठ्या...

09.03 AM

तुर्भे  - दगडखाणींमुळे प्रदूषणात 10 टक्के वाढ होत असून त्यामुळे नागरिकांना श्‍वसनविकारांचा सामना करावा लागत आहे. याच...

05.33 AM