'शिफू सनकृती'च्या तपासावर न्यायालय समाधानी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

मुंबई - 'शिफू सनकृती'च्या प्रसारामार्फत देहविक्री आणि अंमलीपदार्थांचा व्यवसाय सुरू असल्याच्या आरोपांच्या पोलिस तपासावर मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी समाधान व्यक्त केले. या तपासामध्ये अनेक धक्कादायक खुलासे होत असल्याचे मतही न्यायालयाने मांडले.

सोशल मीडियाच्या साह्याने "शिफू सनकृती'चा प्रसार करणाऱ्या सुनील कुलकर्णीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. न्या. रणजीत मोरे व न्या. बदर यांच्या खंडपीठापुढे आज पोलिसांनी या प्रकरणातील तपासाचा अहवाल दाखल केला. पोलिसांच्या कामगिरीवर न्यायालयाने समाधान व्यक्त केले. महाविद्यालयातील दोन विद्यार्थिनींच्या पालकांनी केलेल्या याचिकेवरून तपासाचा आदेश न्यायालयाने मागील सुनावणीला पोलिसांना दिला होता.

स्वतःला मानसोपचारतज्ज्ञ म्हणवणाऱ्या कुलकर्णीने तरुणींना वेश्‍या व्यवसायात ओढण्याचे आणि अमली पदार्थांचे व्यसन लावण्याचे छुपे काम सुरू केले आहे, यामुळे मुली आमच्याकडे येण्यास तयार नाहीत, असा आरोप पालकांनी केला आहे. दरम्यान आज दोन्ही मुलींनीही न्यायालयात वकिलांमार्फत हजेरी लावली. "आम्हाला या प्रकरणात बाजू मांडायची आहे,' असे त्यांनी सांगितले. त्यासाठी आधी अर्ज करा, मग ठरवू, असे खंडपीठाने दोघींनाही स्पष्ट केले.