तुर्भे रेल्वेस्थानकात फलाटावर क्रिकेट 

तुर्भे रेल्वेस्थानकात फलाटावर क्रिकेट 

तुर्भे - खेळती हवा आणि भरपूर सूर्यप्रकाश अशी रचना असलेले तुर्भे रेल्वेस्थानक एकेकाळी प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते; परंतु या देखण्या व टोलेजंग वास्तूच्या देखभाल व दुरुस्तीकडे सिडकोने दुर्लक्ष केल्याने त्याची रयाच गेली आहे. रेल्वेस्थानकाच्या परिसरात आणि फलाटावर मुले क्रिकेट खेळत असतात. त्यामुळे अनेकदा प्रवाशांना चेंडू लागतात. शेजारच्या झोपड्यांतील रहिवासी, गर्दुल्ले आणि भिकारी यांचे जणू ते आश्रयस्थान बनले आहे. येथे दररोज दुपारी आणि रात्री ही मंडळी पहुडलेली असते. यामुळे ते महिला प्रवाशांसाठी असुरक्षित बनले आहे. 

नवी मुंबईतील अनेक रेल्वेस्थानके प्रशिक्षित रेल्वेस्थानक अधीक्षकांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे अनुचित प्रकार किंवा दुर्घटना घडल्यास दाद मागायची कोणाकडे, असा प्रश्‍न प्रवाशांना पडतो. काही महिन्यांपूर्वी तुर्भे स्थानकात तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना घडली होती. त्यानंतरही येथे पोलिस बंदोबस्त ठेवलेला नाही. स्थानकाच्या एका बाजूला औद्योगिक वसाहत, तर दुसऱ्या बाजूला एपीएमसी आहे. त्यामुळे येथे प्रवाशांची नेहमी वर्दळ असते. काही महिन्यांपूर्वी रेल्वेस्थानकाच्या डागडुजीचे काम सिडकोने हाती घेतले होते. त्यावेळी हळवण्यात आलेली आसने गायब असल्याने प्रवाशांना लोकलची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागते. स्थानकाच्या शेजारी प्रवाशांसाठी भुयारी मार्ग बांधला आहे. मात्र त्यात विजेची सोय नसल्याने अंधार असतो. झिरपणारे पाणी, कुबट वास आणि घाण असलेला हा भुयारी मार्ग गर्दुल्ले व मद्यपींचा अड्डा बनला आहे. भुयारी मार्गात बारमाही घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. त्यामुळे नागरिकांना नाकावर रुमाल ठेवूनच ये-जा करावी लागते. भुयारी मार्गाच्या पायऱ्या तुटलेल्या आहेत. सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत तो सुरू असतो. भुयारी मार्ग सिडकोच्या अंतर्गत असल्याने रेल्वे त्याकडे लक्ष देत नाही. रेल्वेस्थानकातील पाणपोईचे नळ गायब झाले आहेत. रेल्वेस्थानकांतील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वेने तिकिटासाठी तेवढी सुविधा दिलेली नाही. पूर्वेकडील तिकीट खिडक्‍या सुरू केल्या नसल्याने तुर्भे स्टोअर येथील खासगी काऊंटरवरून तिकीट घ्यावे लागते. त्यासाठी त्यांना जादा पैसे मोजावे लागतात. सकाळी 9 ते रात्री दहापर्यंत येथे बच्चे कंपनीचे क्रिकेटचे सामने रंगलेले असतात. त्याचा त्रास प्रवाशांना होतो. येथील अग्निसुरक्षा रामभरोसे आहे. शेकडो प्रवासी रेल्वे रूळ ओलांडून जातात. त्यामुळे येथे अपघातांचे प्रमाण अधिक आहे. महिलांसाठी येथे स्वच्छतागृह नाही. 

तुर्भे रेल्वेस्थानक महिलांसाठी असुरक्षित आहे. येथे आरपीएफचे मुख्य कार्यालय असूनही छेडछाडीच्या घटना घडतात. फलाटांवर रेल्वे पोलिस नसतात. येथे पोलिस बंदोबस्त वाढवण्याची गरज आहे. चौकी एका बाजूला असल्याने पोलिस कधीही इतर फलाटावर गस्त घालत नाहीत. 
- अभिजित धुरत, रेल्वे प्रवाशी वेल्फेअर असोसिएशन. 

तुर्भे स्थानकातील सेवा-सुविधा व सुरक्षा तोकडी पडत असल्याने इतर स्थानकांच्या तुलनेत ते असुरक्षित आहे. महिला स्वच्छतागृहाची स्वच्छता राखली जात नाही. रेल्वे रूळ प्रवासी ओलांडत असल्याने अपघाताचा धोका आहे. 
- दीपक गायकवाड, प्रवासी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com