बनावट औषधे तयार करणाऱ्यांना दणका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जानेवारी 2017

मुंबई, ठाण्यासह बुलडाण्यात एफडीएची कारवाई

मुंबई, ठाण्यासह बुलडाण्यात एफडीएची कारवाई
मुंबई - दक्षिण मुंबईतील बनावट सौंदर्यप्रसाधने तयार करणाऱ्या कंपनीवर छापा घातल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबई, ठाण्यासह बुलडाण्यातही अशा कंपन्यांना दणका दिला आहे. दहिसर येथे सिप्ला कंपनीची बनावट औषधे तयार करणाऱ्या कंपनीविरोधात "एफडीए'ने कारवाई केली आहे. ठाण्यात बनावट सौंदर्यप्रसाधने तयार करणाऱ्या कंपनीवर आणि औषधांबाबत ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या वितरकावर कारवाई करण्यात आली. बुलडाणा येथील बनावट सौंदर्यप्रसाधने तयार करणाऱ्या कंपनीवरही कारवाई केली. कुलाबा येथील विक्रेत्याकडे बनावट औषधांचा साठा असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली. यातून ही औषधे दहिसर येथील "साई शिवाई फार्मा' कंपनीतून येत असल्याचे स्पष्ट झाले.

कंपनीचा मालक निर्मल खतवानी याच्याकडे चौकशी करून 35 इन्हेलर कंटेनर ताब्यात घेतले. याबाबत सिप्ला कंपनीकडे चौकशी केली असता या उत्पादनाची तारीख, बॅच क्रमांक आदी या कंपनीच्या उत्पादनाशी जुळून आले नाही. त्यामुळे "एफडीए'ने खतवानीविरोधात गुन्हा दाखल केला.

"एफडीए'च्या ठाणे कार्यालयाने वसई पूर्व येथील बनावट सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या कंपनी व दुकानांवर छापा घातला. या कारवाईत दहा लाखांच्या उत्पादनासाठी लागणारे साहित्य व कच्चा माल जप्त करण्यात आला. दुसऱ्या प्रकरणात ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती देणाऱ्या आयुर्वेदिक औषधांच्या वितरकावर कारवाई करण्यात आली. त्याच्याकडे 10 लाख 55 हजारांचा आयुर्वेदिक औषधांचा साठा सापडला. बुलडाणा येथेही बनावट सौंदर्यप्रसाधनांची विक्री करणाऱ्या दुकानावर एफडीए अधिकाऱ्यांनी छापा घातला. बनावट सौंदर्यप्रसाधनांतील काही घटकद्रव्ये शरीरास अपायकारक असू शकतात, त्यामुळे नागरिकांनी परवाना असलेल्या उत्पादकांची उत्पादनेच वापरावीत, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी केले आहे.

Web Title: crime on bogus medicine making