सुटकेसमधील मृतदेहाचे गूढ अखेर उकलले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

मुंबई - लोकमान्य टिळक टर्मिनसजवळ सुटकेसमध्ये सापडलेल्या 12 वर्षीय मुलाच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई - लोकमान्य टिळक टर्मिनसजवळ सुटकेसमध्ये सापडलेल्या 12 वर्षीय मुलाच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

रणधीर सहानी असे हत्या झालेल्या मुलाचे नाव असून तो मूळचा बिहारमधील आहे. मालाड येथील कुरार परिसरातील बांगड्या बनवण्याच्या कारखान्यात तो कामाला होता. त्याच्या हत्येप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी शिवनाथ सहानी (वय 36), त्याची पत्नी रेणूदेवी (35), मुलगा रणविजय (20) यांच्यासह कृष्णा सहानी (28), रामानंद सहानी (45) व विनय सहानी (33) यांना अटक केली आहे.

कारखान्याचा मालक रणविजय याने रणधीरची हत्या केली असून इतर आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत केली.

रणधीर उशिरा उठल्यामुळे रणविजयने त्याला मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यांनी ट्रॉली बॅगमध्ये मृतदेह भरला.

लोकमान्य टिळक टर्मिनसहून बिहारला नेऊन मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा त्यांचा इरादा होता, पण टर्मिनसवरील मेटल डिटेक्‍टर पाहून आरोपी घाबरले व स्थानकाजवळच एका ठिकाणी बॅग सोडून पळून गेले. एका हमालाने त्यात काही तरी मौल्यवान वस्तू असतील असे वाटून बॅग उचलली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात याचे चित्रीकरण झाले. हमालाला मध्य प्रदेशातून ताब्यात घेतल्यावर त्याने आपला हत्येशी संबंध नसल्याचे सांगितले. तपासाला वेगळे वळण मिळाले. बॅगेवरील बॅजवरून पोलिस मालाडमधील एका दुकानापर्यंत पोचले. त्या वेळी दोघा जणांनी 8 जानेवारीला ही बॅग खरेदी केल्याचे समजले. त्यानंतर पोलिस आरोपींपर्यंत पोहोचले.

आरोपींनी मुलाच्या बिहारमधील कुटुंबियांना सव्वा लाख रुपये देऊन मुलाचा दुर्धर आजाराने मृत्यू झाल्याचे सांगितले होते.

Web Title: crime in mumbai