ब्रिटन पाहायचंय, सीएसटीला चला!

ब्रिटन पाहायचंय, सीएसटीला चला!

मुंबई - मुंबईत ब्रिटन अनुभवायचा असेल, तर सहा महिन्यांनी छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरात फिरायला जायला काही हरकत नाही. महापालिका सीएसटीच्या संपूर्ण परिसराला हेरिटेज लूक देणार आहे. स्थानकाच्या परिसरातील रेलिंग, पथदीप व पदपथांबरोबरच प्रसिद्ध भुयारी मार्गही ब्रिटिश काळानुसार बनवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी सुमारे चार कोटींपर्यंत खर्च येणार असून, त्यातील पहिला टप्पा म्हणजे दर्शनी गॅलरीचे गुरुवारी उद्‌घाटन झाले. भुयारी मार्गाचा कायापालट करण्याचा प्रस्ताव लवकरच स्थायी समितीपुढे सादर होणार आहे. 

केंद्रीय नगरविकास विभागाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत आयकॉनिक पर्यटनस्थळ म्हणून सीएसटीची निवड केली आहे. त्यानुसार महापालिका त्या परिसराचा कायापालट करणार आहे. परिसरातील अस्वच्छता हटवून नवी झळाळी देण्यात येईल. ब्रिटिशांनी सीएसटी स्थानक बांधले, तेव्हा जसा परिसर होता त्याच धर्तीवर विकास करण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या म्हणजे सीएसटीला लागून असलेल्या भुयारी मार्गालाही हेरिटेज लूक देण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा अंतिम झाल्या असून, लवकरच त्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मांडण्यात येणार आहे, असे ए प्रभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले. सीएसटीच्या परिसराचा संपूर्ण कायपालट सहा महिन्यांत होईल. जुन्या काळातीलच चित्र उभारायचे असल्याने गॅलरीचे दगडी बांधकाम करण्यात आले आहे. सिरॅमिक टाइल्स वापरण्यात आलेल्या नसून खास जैसलमेरवरून दगड आणून गॅलरी उभारण्यात आली आहे. गॅलरीचे गुरुवारी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. त्या वेळी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर, पर्यावरण मंत्री रामदास कदम, भाजपचे आमदार राज पुरोहित, आयुक्त अजोय मेहता आदी उपस्थित होते. पुढील पाच वर्षांनीही शिवसेनेचा भगवा महापालिकेवर फडकेल आणि गॅलरीमुळे तो अधिक चांगल्या प्रकारे दिसेल, असेही ठाकरे यांनी नमूद केले.

सेल्फी पॉईंट नाही गॅलरी 
मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी दादर शिवाजी पार्कमध्ये मुंबईतील पहिला सेल्फी पॉईंट उभारला होता. नगरसेवकपदाची मुदत संपल्यानंतर त्यांनी तो काढून टाकला होता. त्यावरून चांगलेच राजकरण पेटले होते. सीएसटीतील दर्शनी गॅलरीचा उल्लेखही सेल्फी पॉईंट असा केला जात होता. मात्र, तो सेल्फी पॉईंट नसून पर्यटकांना विनाअडथळा सीएसटी आणि महापालिका मुख्यालयाची इमारत पाहता यावी म्हणून उभारण्यात आलेली गॅलरी आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. पर्यटकांना विनाअडथळा सीएसटी आणि पालिका मुख्यालयाच्या इमारतींबरोबर सेल्फी घेता येणार आहे. विनाअडथळा सीएसटी आणि पालिका मुख्यासयाच्या इमारतींबरोबर सेल्फी घेता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com