दादरमध्ये मोबाईलचोराने वृद्धाला फलाटावर ढकलले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

मुंबईः दादर रेल्वेस्थानकातून कल्याणच्या दिशेने जात असलेल्या लोकलमध्ये एका चोराने मोबाईल चोरण्याच्या उद्देशाने एका ज्येष्ठ नागरिकाला ढकलल्याने तो फलाटावर पडून जखमी झाला. इंद्रकुमार फडणीस (वय ६७) असे त्यांचे नाव असून लोकल वेगात नसल्याने ते किरकोळ जखमी झाले. दादर स्थानकातील तात्काळ सेवा निरुपयोगी ठरल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार होऊ शकले नाहीत.  

दादर स्थानक प्रचंड गर्दीचे मानले जाते. मध्य आणि पश्‍चिम रेल्वेच्या सर्वच प्रवाशांची तिथे नेहमीच गर्दी असते; मात्र स्थानकातील आपत्कालीन सेवा निरुपयोगी ठरत असल्याचा अनुभव मंगळवारी (ता. ११) फलाट क्रमांक एकवर आला. दुपारी दोनच्या दरम्यान कल्याणच्या दिशेने निघालेल्या लोकलमध्ये इंद्रकुमार फडणीस चढले. मात्र मोबाईल चोराने त्यांना हिसका दिल्याने ते खाली पडले. त्यांच्या डोक्‍याला मार लागला. गाडीने वेग घेतल्याने चोर पळून जाण्यात यशस्वी झाला. फलाटावरील प्रवासी आकीब शेख आणि जयेश विश्‍वकर्मा यांनी फडणीस यांना पाणी आणि प्रथमोपचार दिले. रेल्वेस्थानकात कोणतीही तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध नव्हती. दादर स्थानकाच्या उपव्यवस्थापकांनी ‘१०८’ क्रमांकाच्या हेल्पलाईनवर कॉल करायचा प्रयत्न केला असता आम्ही लवकरच सुविधा पुरवू, अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. बराच वेळ वैद्यकीय सेवा न मिळाल्याने उपव्यवस्थापकांनी आणि प्रवाशांनी टॅक्‍सीने फडणीस यांना शीव रुग्णालयात दाखल केले.

वैद्यकीय सुविधा न मिळणे दुर्दैवी
‘१०८’ क्रमांकाची आपत्कालीन सेवा रेल्वेसाठी असूनही दादरसारख्या महत्त्वाच्या स्थानकात रुग्णवाहिका, डॉक्‍टर वा चालक उपस्थित नसणे गंभीर आहे. रेल्वेमधील चोऱ्यांवर आळा बसणे आवश्‍यक आहे, असे मत प्रवासी आकीब शेख यांनी व्यक्त केले. महत्त्वाच्या स्थानकांवर २४ तास आपत्कालीन वैद्यकीय सुविधा असणे आवश्‍यक आहे; परंतु ती नसणे हे प्रवाशांचे दुर्दैव आहे, असे प्रवासी जयेश विश्‍वकर्मा म्हणाले.

Web Title: Dadar: thief pushed the older platform