धामणी धरण शंभर टक्के भरले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

डहाणू - वसई-विरार शहरासह मीरा-भाईंदर परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या प्रकल्पातील धामणी धरण शंभर टक्के भरले असून, धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. विक्रमगड तालुक्‍यात असलेल्या सूर्या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धामणी धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी येऊ लागले. सावधगिरीचा उपाय म्हणून धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात येऊन सहा हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. धरण भरल्यामुळे वसई-विरार परिसराच्या पाण्याची चिंता मिटली आहे. सूर्या नदीच्या पातळीत वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.