मुलीसह परदेशात पळालेल्या पित्याला परतण्याचे आवाहन

- सुनीता महामुणकर
रविवार, 5 मार्च 2017

मुंबई - मुलीला घेऊन इटलीला पळून गेलेल्या पित्याने पुन्हा भारतात परतावे, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाने केले आहे. मुलीला घेऊन परतल्यास पित्यावर कोणतीही कारवाई न करता हे प्रकरण सामोपचाराने सोडवण्याची सूचनाही न्यायालयाने केली आहे.

मुंबई - मुलीला घेऊन इटलीला पळून गेलेल्या पित्याने पुन्हा भारतात परतावे, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाने केले आहे. मुलीला घेऊन परतल्यास पित्यावर कोणतीही कारवाई न करता हे प्रकरण सामोपचाराने सोडवण्याची सूचनाही न्यायालयाने केली आहे.

पुण्यातील घटस्फोट प्रकरणाशी संबंधित विवाहितेने मुलीच्या ताब्याबाबत उच्च न्यायालयात याचिका केली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार मुलीचा ताबा आईकडे आहे. तिला भेटण्यासाठी स्थानिक न्यायालयाने वडिलांना परवानगी दिली होती; मात्र काही महिन्यांपूर्वी वडील मुलीसह परदेशात निघून गेले. त्यांच्याशी काहीही संपर्क होत नसल्याने अखेर विवाहितेने तक्रार केली. न्या. व्ही. एम. कानडे आणि न्या. पी. आर. बोरा यांच्या खंडपीठाने याबाबत केंद्र सरकारसह व्होडाफोन मोबाईल कंपनी आणि संबंधित यंत्रणेला तपासात मदत करण्याचा आदेश दिला आहे; मात्र अद्याप त्या मुलीचा आणि तिच्या पित्याचा काहीच थांग लागला नाही. मुलीला घेऊन पळालेल्या पित्याच्या शोधासाठी केंद्र सरकारच्या वतीने इंटरपोल नोटीसही जारी केली आहे. या नोटिसीमार्फत भारतात परत येऊन याप्रकरणी तोडगा काढण्याबाबची सूचनाही न्यायालयाने केली आहे.

वडील मुलीसह भारतात परतले, तर त्यांच्यावर न्यायालयाच्या अवमानाची कारवाई केली जाणार नाही किंवा त्यांना तुरुंगात डांबून ठेवले जाणार नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. मुलीच्या भवितव्यासाठी न्यायालयाने सामंजस्याची भूमिका घेतली आहे. मुलीच्या शिक्षण आणि सुरक्षेबाबत वडिलांनी काही योजना आखल्या असतील, तर त्यांचाही विचार करण्यात येईल, असेही खंडपीठाने म्हटले आहे. इटलीमधील भारतीय राजदूतांनाही याबाबत न्यायालयाने निर्देश दिले आहेत.