दर महिन्याला 10 पाळीव प्राण्यांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

प्रिव्हेन्शन ऑफ ऍनिमल क्रुएल्टी ऍक्‍टनुसार, पाळीव प्राण्यांच्या मूलभूत गरजा न पुरवणाऱ्या मालकांना 50 रुपयांचा दंड ठोठावता येतो. या दंडाची रक्कम वाढली तरच त्यांना जरब बसेल व जनजागृती होईल.
- डॉ. के. सी. खन्ना, सचिव, बैलघोडा रुग्णालय

प्लॅस्टिक गिळलेल्या प्राण्यांवर बैलघोडा रुग्णालयात शस्त्रक्रिया
मुंबई - प्लॅस्टिकच्या पिशव्यांत बांधून अन्नपदार्थ फेकण्याच्या माणसांच्या सवयीमुळे ते प्राण्यांच्या पोटात जाऊ लागले आहे. गाय, बकऱ्यांसारख्या पाळीव प्राण्यांच्या मृत्यूमागे प्लॅस्टिक हेच प्रमुख कारण आहे. दर महिन्याला परळमधील बैलघोडा रुग्णालयात 10 पाळीव प्राणी प्लॅस्टिक खाल्ल्यामुळे मरतात, अशी माहिती या रुग्णालयाचे सचिव के. सी. खन्ना यांनी दिली.

आठ वर्षांपूर्वी आम्ही एका गाईच्या पोटातून तब्बल 42 किलो प्लॅस्टिक काढले होते. आजही दर महिन्याला प्लॅस्टिक गिळलेल्या गाई, बकऱ्यांना रुग्णालयात दाखल केले जाते. त्यांना वाचवणे खूपच कठीण असते. या पाळीव प्राण्यांना डम्पिंग ग्राऊंडवर सोडणे तर फारच घातक असते, असे डॉ. खन्ना म्हणाले. पोट फुगलेल्या, श्‍वसनाचा त्रास असलेल्या प्राण्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असतात. काहीही न खाता गाय सतत वांत्या करत असेल तर तिच्या पोटात हमखास प्लॅस्टिक असते. पोटात प्लॅस्टिकचे गोळे साचल्यामुळे प्राण्याने खाल्लेले अन्न तोंडातून पुन्हा बाहेर फेकले जाते. अन्न पुढे ढकलण्याची प्रक्रियाच बंद होते. महम्मद अली रोड, क्रॉफर्ड मार्केट, कुर्ला, भायखळा, खार, माहीम, सांताक्रूझ, देवनार आदी भागांतून असे प्राणी मोठ्या प्रमाणात आणले जातात. प्लॅस्टिकचे प्रमाण शरीरात जास्त असल्यास प्राणी दगावण्याची शक्‍यता मोठी असते, असे त्यांनी सांगितले.

तीन वर्षांत मृत्यू झालेले प्राणी
2014 - बकऱ्या 38, गाई 40
2015 - बकऱ्या 40, गाई 44
2016 (आतापर्यंत) - बकऱ्या 41, गाई 47

कुत्र्यांनाही धोका
होळीच्या वेळी पाण्याने भरलेले फुगे व प्लस्टिकच्या पिशव्या रस्त्यावर पडलेल्या असतात. तहानलेली भटकी कुत्री हे फुगे व पिशव्या खातात. अशी 10 ते 15 कुत्री होळीच्या दिवशी बैलघोडा रुग्णालयात आणली जातात.

टॅग्स