महापौरांच्या राजीनाम्याची मनसेची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

कल्याण - भारत सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात कल्याण-डोंबिवली पालिकेचा क्रमांक मागील वर्षीच्या तुलनेत खाली घसरल्याने नैतिक जबाबदारी समजून महापौर राजेंद्र देवळेकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. प्रशासनाचा कारभार नीट चालावा, यासाठी तुकाराम मुंढे यांच्यासारखा कर्तव्यदक्ष अधिकारी पालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त करावा, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

मागील वर्षी 64 व्या स्थानावर असलेल्या पालिकेने वर्षभरात स्वच्छता अभियानासाठी लाखो, कोट्यवधी रुपये खर्च केले. त्याचे फलित काय? असा प्रश्‍न पालिकेतील विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी पत्रकार परिषद केला. या वेळी गटनेते मंदार हळबे, माजी आमदार प्रकाश भोईर, प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, डोंबिवली शहरप्रमुख मनोज घरत, कल्याण शहरप्रमुख कौस्तुभ देसाई, महिला आघाडीच्या शितल विखणकर, नगरसेविका कस्तुरी देसाई उपस्थित होते. पालिकेतील सत्ताधारी उंटावरून शेळ्या हालत असल्याचे सांगत त्यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते भोईर यांनी केला. सरकार, तसेच प्रशासन करदात्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचेही ते म्हणाले. ज्या ठिकाणी सत्ता आहे, तेथील शहरांचीही पारदर्शकतेने यादी प्रसिद्ध केल्याबद्दल राजेश कदम यांनी सरकारचे अभिनंदन केले. पालिकेतील सत्ताधारी पक्षाचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारत महापौर राजेंद्र देवळेकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. 

गटनेते हळबे म्हणाले, हे सर्वेक्षण सुरू असताना पालिका क्षेत्रात स्वच्छता राखली जात होती. प्रशासनाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे; मात्र नगरसेवक निधी देऊनही गाड्या येत नाही. हे वास्तव आहे. डोंबिवली शहरप्रमुख घरत यांनीही पालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली. मनसेच्या माध्यमातून सामाजिक चळवळ उभी करण्यावर यापुढे पक्षाचा भर असेल, असे या वेळी स्पष्ट करण्यात आले.