महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मीच राहणार आहे - देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

विरोधक संघर्षयात्रेत हजार लोक पण जमा करू शकले नाहीत , त्यांचा संघर्ष स्वतः शीच होता. विरोधकांच्या 5 वर्षांच्या कामापेक्षा या सरकारचं अडीच वर्षांचं काम निश्चीतच जास्त आहे

मुंबई -  "महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मीच राहणार आहे. जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत मी इथेच राहणार आहे, दानवे पण प्रदेशाध्यक्ष पदी राहणार आहेत. तेव्हा अफवांवर विश्वास ठेवू नका,' असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरुवार) भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राज्य अधिवेशनात बोलताना केले. याखेरीज फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात विविध संवेदनशील मुद्यांना स्पर्श केला.  

फडणवीस म्हणाले - 

 • देशाच्या इतिहासातला भाजपा सर्वात मोठा पक्ष. 19 राज्यांमध्ये सरकार
 • भाजपासाठी अनुकूल वातावरण आहे. सत्तेचा विचार न करता विचारांची कटीबद्धता असलेली कार्यकर्त्यांची फळी आणि नरेंद्र मोदींबद्दल असलेला विश्वास यामुळे हे वातावरण तयार झालं आहे .
 • भ्रष्टाचाराने बरबटलेल्या  राजकीय व्यवस्थेतून मोदींनी देशाला बाहेर काढलं., भ्रष्टयाचाराविरोधातली लढाई मोदींनी सुरू केली. यामुळे सामान्यांमध्ये विश्वास वाढला 
 • मोदी हे व्यक्तिकरता काम करत नाहीत. हे सरकार जनतेसाठी काम करतं हा विश्वास मोदींनी तयार केला हा विश्वास खालपर्यंत नेणं हे कार्यकर्त्यांसह सगळ्यांचीच जबाबदारी आहे. ताकदीने हे निर्णय खालपर्यंत जात नाही आहेत. हा विश्वास लोकांपर्यंत पोहोचवू शकलो तर पुन्हा कधीही पराजित होणार नाही
 • विरोधक संघर्षयात्रेत हजार लोक पण जमा करू शकले नाहीत , त्यांचा संघर्ष स्वतः शीच होता. विरोधकांच्या 5 वर्षांच्या कामापेक्षा या सरकारचं अडीच वर्षांचं काम निश्चीतच जास्त आहे.
 • शेतकऱयांशी चर्चेला राज्य सरकार तयार. प्रश्न चर्चेतून सुटतात. खऱ्या शेतकऱयांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, म्हणून निकष लावण्यात आले आहेत. शेतकऱ्याचे फॉर्म भरायला सर्व कार्यकर्त्यांनी मदत करावी
 • कर्जमाफी हा उपाय होऊ शकत नाही. कर्जमाफी कडून कर्जमुक्तीकडे जावं लागेल. कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढवली पाहिजे. सरकार शाश्वत पाणी, वीज देण्यासाठी कटीबद्ध. 66 हजार कोटी रुपये शेतीत गुंतवणूक झालेली आहे. गुंतवणुकीची प्रक्रिया या सरकारने सुरू केली आहे , कितीही ताण आला तरी ती वाढवतच नेणार...
 • मराठा समाजाचं अभिनंदन , अत्यंत शिस्तबद्ध मोर्चे , राजकीय व्यासपीठ म्हणून कोणत्याही राजकीय पक्षाला वापरायला दिलं नाही. ज्या प्रमाणे मराठा समाजाच्या पाठीशी सरकार उभं राहिलं त्याचप्रमाणे  ओबीसी समाजाच्या पाठिशीही सरकार उभं राहिलं. समाजा समाजात सरकारने कलह निर्माण केला नाही
 • समन्वय घडवून प्रत्येक समाजाला पुढे न्यायचं आहे , सर्व समाजासाठी मोठया प्रमाणात योजना तयार केल्या.
 • महाराष्ट्राने जी गरुडझेप घेतली आहे 2 लाख 40 हजार कोटींपिकी एकट्या महाष्ट्रात 1 लाख 20 हजार कोटी परकीय गुंतवणूक आली .
 • लोकांपर्यंत पोचण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे स्वतःची व्यवस्था उभी करणार, यासाठी विस्तारकाची योजना सुरू केली आहे , बूथ उभारणीसाठी एप सुरू करणार यातून 90 हजार बूथ स्थापन करणार
 • 2008-9 साली कर्जमाफी केली होती तर आता पुन्हा शेतकरी कर्जबाजारी का झाला? स्वामिनाथन आयोगाचा अहवाल 2004 साली आला, मात्र 2014 पर्यंत या आयोगावर कार्यवाही नाही
 • 15 ऑगस्टला झेंडा फडकवू देणार नाही असं आंदोलन करणं हा देशद्रोह आहे. सत्ता गेली तरी चालेल, पण देशाचा झेंडा फडकावणारच. या आंदोलनाच्या पाठीशी जे लोक आहेत त्यांना फक्त अराजकता पसरवायची आहे. या राज्यातले शेतकरी सुजाण आहेत इथले शेतकरी अशा आंदोलनाला भीक घालणारे नाहीत.