देवगड, रत्नागिरी हापूसला "जीआय'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

मुंबई - देवगड आणि रत्नागिरीतील हापूस आंब्याला गुरुवारी इंडियन पेटंट ऑफिसकडून भौगोलिक निर्देशांक (जीआय) मिळाला. त्यामुळे हापूस कोणाचा, या प्रश्‍नाला आता "कोकणचाच', हे उत्तर मिळाले आहे. त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांबरोबरच ग्राहकांच्याही हक्कांचे संरक्षण होणार आहे.

देवगड व रत्नागिरी हापूसबाबत गेल्या वर्षीही असा निर्णय देण्यात आला होता. मात्र, त्यास कोकणातील अन्य आंबा उत्पादकांनी विरोध केला होता. "हापूस' हे नाव वापरण्याचा अधिकार केवळ या दोन भागांतील शेतकऱ्यांनाच का, असा त्यांचा आक्षेप होता. त्यामुळे या मुद्द्यावर पुन्हा सुनावणी झाल्यानंतर आज हा अंतिम आदेश देण्यात आला. हा आदेश 27 एप्रिलला जर्नलमध्ये (गॅझेट) प्रसिद्ध होणार आहे. या निर्णयानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदार "रत्नागिरी हापूस' या नावाने, तर देवगड तालुक्‍यातील बागायतदार "देवगड हापूस' या नावाने आंबा विकू शकतील. कोकणातील अन्य जिल्ह्यांतील शेतकरी केवळ "हापूस' या नावानेच आंबे विकू शकतील.

देवगड, रत्नागिरी हापूसला "जीआय' मिळण्यासाठी पुण्यातील प्राध्यापक, "जीआय' विषयातील अभ्यासक गणेश हिंगमिरे यांनी देवगड-रत्नागिरीतील काही शेतकऱ्यांच्या वतीने पाच वर्षांपूर्वी अर्ज केला होता. त्यावर देशभरात विविध ठिकाणी सुनावण्या झाल्यावर इंडियन पेटंट ऑफिसचे कंट्रोलर जनरल ओमप्रकाश गुप्ता यांनी मुंबईत हा आदेश दिला.

Web Title: devgad ratnagiri hapus mango GI