अतिसाराने मुंबई बेजार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

पाच हजारांहून अधिक फेरीवाल्यांवर कारवाई

पाच हजारांहून अधिक फेरीवाल्यांवर कारवाई
मुंबई - कडाक्‍याच्या उन्हामुळे आजार वाढत चालले असून रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमुळे त्यात वाढ होत आहे. असे निकृष्ट पदार्थ विकणाऱ्यांवर महापालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. मुंबईच्या विविध भागांत केलेल्या कारवाईत पाच हजारांहून अधिक फेरीवाल्यांविरुद्ध केलेल्या कारवाईत फळे, भाज्या, अन्नपदार्थ, सरबते आदी जप्त करून नष्ट करण्यात आले. मुंबई अतिसाराने हैराण झाली असल्याने पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने ही प्रतिबंधात्मक कारवाई केली.

आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीत अनेक ठिकाणी अन्नपदार्थ व शीतपेये विक्रेत्यांकडील बर्फ, पेय, अन्न, फळे व भाज्या निकृष्ट दर्जाच्या असल्याचे आढळून आले आहे. कारवाईत हे पदार्थ जप्त करून नष्ट करण्यात आले. अतिसाराचा काही प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आलेल्या मुंबईतील सात विभागांत जनजागृती केली जात आहे. घरोघरी जाऊन औषधे दिली जात आहेत, अशी माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली. कुर्ला, चेंबूर, गोरेगाव, घाटकोपर, मालाड, कांदिवली, बोरिवली या भागात अतिसाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. निकृष्ट खाद्यपदार्थांबाबत प्रतिबंधात्मक कारवाई अधिक तीव्र केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

11 हजार किलो मिठाई व खाद्यपदार्थ जप्त
आतापर्यंत दोन हजार 571 किलो मिठाई, नऊ हजार 756 किलो खाद्यपदार्थ, सात हजार 603 लिटर शीतपेये आणि पाच हजार 603 किलो फळे व भाज्या इत्यादी जप्त करून नष्ट करण्यात आल्या आहेत. पाणीपुरी, भेळपुरी हे पदार्थ खाण्याचे टाळावे, असे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे.

Web Title: diarrhea patient in mumbai