खासगी मेडिकल कॉलेजांना 'डीएमईआर'चा इशारा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

जादा फी आकारल्यास मान्यता काढणार

जादा फी आकारल्यास मान्यता काढणार
मुंबई - खासगी मेडिकल कॉलेजांमार्फत पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून जादा फी आकारण्यात येत असल्याचे उघडकीस आल्यानंतर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) आक्रमक भूमिका घेतली आहे. शिक्षण शुल्क समितीने निर्धारित केलेल्या फीपेक्षा अधिक फी घेणाऱ्या कॉलेजांची मान्यता काढण्याचा इशारा डीएमईआरचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी गुरुवारी दिला. त्याचप्रमाणे या कॉलेजांना दंडही आकारण्यात येणार आहे.

अभिमत विद्यापीठ आणि खासगी मेडिकल कॉलेजांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मनमानीपणे फी आकारण्यात येत असल्याची तक्रार पालकांकडून करण्यात आली आहे.

भारतीय आयुर्विज्ञान परिषद व केंद्र सरकारच्या निर्णयानुसार 2017 पासून सरकारी, महापालिका, खासगी, अल्पसंख्याक, अभिमत कॉलेजांच्या सामाईक प्रवेश प्रक्रिया पहिल्यांदाच राज्य सरकारतर्फे राबविण्यात येत आहे. येथील जागांचे शुल्क ठरविण्याचे अधिकार राज्य सरकारच्या शिक्षण शुल्क सीमितीकडे असल्याचे डॉ. शिनगारे यांनी सांगितले. तर या समितीने खासगी मेडिकल कॉलेजांनी मेरीट कोट्यानुसार निर्धारित केलेले शुल्क हे 4.50 लाखांपासून ते 9.50 लाखांपर्यंत आहे. खासगी मेडिकल कॉलेजांमधील त्यांच्या पायाभूत सोयीसुविधा व प्राध्यापक वर्ग यांच्यावर आधारित समितीने हे शुल्क निश्‍चित केले असल्याचे ते म्हणाले. उद्यापासून पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेला सुरवात होणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

खासगी कॉलेजांचा आडमुठेपणा
राज्यातील खासगी मेडिकल कॉलेजांच्या एकूण 15 पैकी नऊ कॉलेजांनी सरकारतर्फे जागा भरण्यास नकार दिला होता. त्याचा फटका प्रवेशप्रक्रियेला बसला आहे. या कॉलेजांसोबत बोलणी झाल्याने कॉलेजांनी या जागा देण्यास होकार दिल्याची माहिती डॉ. शिनगारे यांनी दिली.

Web Title: dmer warning to private medical college