'सावित्रीबाई फुले नाट्यगृहाला वाचवा'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

डोंबिवली - येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचा भटारखाना न करता ते वाचवा, या मागणीसाठी मनसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी रविवारी (ता. २०) नाट्यगृहात ठिय्या आंदोलन केले. शनिवारी रात्री ७ सिलिंडर वापरून जेवण बनवले जात असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर असा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करा, अशी मागणी करत मनसेने अनेक प्रश्‍नही उपस्थित केले.

डोंबिवली - येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचा भटारखाना न करता ते वाचवा, या मागणीसाठी मनसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी रविवारी (ता. २०) नाट्यगृहात ठिय्या आंदोलन केले. शनिवारी रात्री ७ सिलिंडर वापरून जेवण बनवले जात असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर असा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करा, अशी मागणी करत मनसेने अनेक प्रश्‍नही उपस्थित केले. दरम्यान, कल्याण-डोंबिवलीतील नाट्यगृहांचा नाट्यप्रयोगांपेक्षा इतर समारंभांसाठी आणि व्यावसायिक वापर होत असल्यामुळे सावित्रीबाई नाट्यगृह की भटारखाना?, नाट्यगृह वाचवा या पोस्टने आज सोशल मीडियावर डोंबिवलीकर रसिकांच्या आणि नाट्यकर्मींच्या असंतोषाला वाट मोकळी करून दिली.

डोंबिवलीतील सावित्रीबाई नाट्यगृह नाटकांसाठी बंद पडायच्या किंवा जाणूनबुजून बंद पाडण्याच्या मार्गावर आहे. बुकिंगच्या तारखांचा घोळ, काल परवाच केलेली भाडेवाढ आणि आता कुठलीही बुकिंग नसताना सावित्रीबाई कलामंदिरच्या पहिल्या माळ्यावरील कॉन्फरन्स हॉलचे रात्री चक्क भटारखान्यात रूपांतर झालेले या गोष्टी खेदजनक आहेत.  

उंदीर, घुशींच्या त्रासामुळे आणि नुकसानीमुळे खाद्यपदार्थ/जेवण करायला, बनवायला बंदी आहे. प्रेक्षकांना नाट्यगृहात खाद्यपदार्थ नेण्यास बंदी आहे. असे असताना परवानगी कोणी आणि का दिली? रात्री चालणाऱ्या भटारखान्यामुळे नाट्यगृहाला आग लागली, तर कोण जबाबदार? नोंदणीशिवाय रात्रभर वापरले जाणारे पाणी, वीज कोण भरून देणार, असे प्रश्‍न या वेळी मनसेने उपस्थित केले. नाट्यगृहाला लग्नाचा हॉल होण्यापासून वाचवा, अशी मागणी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी केली.