डोंबिवलीः कळशी आणि बादली घेऊन महिला रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

पाणी टंचाई असल्यामुळे 27 गावात टँकरला मोठी मागणी आहे. त्यामुळे काही वेळेला टँकरने पाणी पुरवठा करणे शक्य होत नाही.  27 गावांची पाणी समस्या मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे सातत्याने प्रयत्न करत आहेत.
- आशालता बाबर, स्थानिक नगरसेविका, शिवसेना.

डोंबिवलीः ऐन पावसाळ्यातही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सामाविष्ट असलेल्या 27 गावांतील नागरिकांना पाणी टंचाईच्या भीषण समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर अखेर संतप्त झालेल्या गावातील महिलांनी आज (गुरुवार) सकाळी रिकामा हंडा आणि कळशी घेऊन रस्त्यावर उतरत आपला रोष व्यक्त केला. यावेळी 27 गावाच्या पाणी प्रश्नाचा एकदाच काय तो निकाल लावा, अशी मागणी या महिलांनी केली.

27 गावातील सोनारपाड्यातील नागरिकांनीही नुकतीच पाणी टंचाई विषयी केडीएमसीचे उपमहापौर मोरेश्वर भोईर यांची भेट घेतली होती. पत्र्यावर पडलेले पावसाचे पाणी साठवून कशाप्रकारे सोनारपाड्यातील नागरिक या पाण्याचा आधार घेत आहे, याचे भीषण वास्तवही सकाळने मांडले होते. आता पाणी टंचाईने ग्रासलेल्या नांदीवली गावातील महिलाही आक्रमक होऊन हंडा-कळशी घेऊन आज रस्त्यावर उतरल्या असल्याने यावर लवकर तोडगा निघाला नाही तर येत्या काळात पाणी प्रश्न पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.

पाणी टंचाईचा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून अधिकच तीव्र झाला असून, आता पाण्याचे टँकरही यायचे बंद झाल्यामुळे आम्ही करायचे तरी काय असा संतप्त सवाल या महिलांनी उपस्थित केला. पाण्याचा प्रश्न निकाली लावला नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू, असा इशाराही महिलांनी दिला.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :