सेलिब्रिटींच्या घरी इको फ्रेंडली गणेशा

सेलिब्रिटींच्या घरी इको फ्रेंडली गणेशा

मुंबई - आपल्या सर्वांच्या लाडक्‍या बाप्पाचे सोमवारी धुमधडाक्‍यात आगमन होईल. गेल्या काही दिवसांपासून बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू होती. आकर्षक सजावट, रोषणाई आणि बाप्पासाठी खास आवडीचे मोदक-लाडू असा सारा पाहुणचार सज्ज आहे. मराठी चित्रपटसृष्टीतली सेलिब्रिटीही गणरायांच्या स्वागताला सज्ज आहेत. विशेष म्हणजे अनेक सेलिब्रिटींच्या घरी यंदा इको फ्रेंडली उत्सव साजरा केला जाणार आहे. अभिनेता शशांक केतकर, सुशांत शेलार आणि अभिनेत्री-गायिका केतकी माटेगावकर त्यात आघाडीवर आहे.

शशांक केतकर म्हणतो, की आमच्याकडे ठाण्याला काकाकडे दीड दिवसाचा गणपती असतो. आम्ही काही वर्षांपूर्वीच ठरवल्याप्रमाणे गणपतीची सजावट इको फ्रेंडली पद्धतीनेच केली जाते. कधी कागदाचे मखर किंवा फुलांची सजावट केली जाते. आम्ही मूर्ती ठाण्यातूनच आणतो आणि ती पाण्यात विरघळेल अशीच असते. माझा खरे तर मूर्तीपूजेवर विश्‍वास नाही; परंतु एखादी सकारात्मक शक्‍ती असते हे मी मानतो. म्हणून मी गणपतीला दैवत मानतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आमच्याकडे गणेशमूर्ती विसर्जन झाल्यावर सगळ्यांचा मिळून झणझणीत मिसळीचा बेत असतो. आई उकडीचे मोदक दर वर्षी बनवतेच. मी फार उत्साहाने सर्व तयारी करतो. घरात प्रसन्न वातावरण असते. यंदा मस्त पाच दिवस कामातून सुटी मिळाल्याने खूप धमाल करणार आहे. कामामुळे वर्षभरही ज्यांना भेटण्याची संधी मिळत नाही त्यांची भेट घ्यायला मला खूप आवडेल.

अभिनेता सुशांत शेलारकडेही दीड दिवसाचा गणपती असतो. गणरायाची मूर्ती तो चिंचपोकळीवरून आणतो. तो म्हणाला, की आधी आमचा गणपती गावाला यायचा. आम्ही लहान होतो तेव्हा थर्माकोलचा वापर करून आरास केली जायची; परंतु जसजसे मोठे झालो तेव्हा पर्यावरणाचे महत्त्व समजले. आता मात्र आमच्याकडे दरवर्षी फुलांचीच आरास केली जाते. त्यात आम्ही मोगऱ्याचा वापर जास्त करतो. घरी साफसफाई, रंगकाम आणि रोषणाई केली जाते. माझी बायको सर्व गोष्टी फारच उत्साहाने करते. दर वर्षी बाप्पासाठी आम्ही नवीन छोटीशी वस्तू करत असतो. कंठी म्हणा, हार म्हणा... खरे तर बाप्पा आमच्याकडून हे करवून घेतो, असे म्हटले तरी हरकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com