माळशेजघाटात देशातील पहिला 'पारदर्शक पुल'   

transparent walk way design for malshej
transparent walk way design for malshej

जुन्नर: जुन्नर जवळील माळशेज घाटातील निसर्ग सौंदर्याची भुरळ फक्त महाराष्ट्रच नाही तर देशभरातील पर्यटकांना पडली आहे. माळशेजचे हे सौंदर्य आता जगाच्या नकाशावर आणण्याच्या हालचाली सुरु आहेत. लवकरच माळशेज घाटात देशातला पहिला 'पारदर्शक पूल' (वॉक वे) बांधण्यात येणार आहे.

माळशेज घाटातील 700 मीटर खोल दरीवर 18 मीटर लांबीचा पारदर्शक वॉक वे बांधण्याचा प्रस्ताव ठाणे जिल्हा प्रशासनाने मांडला आहे. प्रस्ताव आणि बजेटला मंजुरी मिळाल्यास येत्या तीन वर्षांत हे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल तसं झाल्यास हा देशातील पहिला पारदर्शक पूल ठरणार.

कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर माळशेजमध्ये पर्यटन विभागाचे रिसॉर्ट आहे. त्याच्या जवळच माळशेजच्या दरीलगत दुमजली इमारत बांधण्यात येणार असून त्यावर हा पारदर्शी वॉक वे असेल. 18 मीटर लांबीचा यू-शेप वॉक वे बांधण्याची प्रशासनाची योजना आहे. 'वॉक वे'चं फ्लोरिंग पारदर्शी काचेचे राहील. या वॉक वे वरुन चालताना पर्यटकांना हवेत चालण्याचं थ्रिल अनुभवता येईल. खोल दरीचा नयनरम्य नजारा पाहता येईल आणि अर्थात डेकवर (काळजी घेऊन) फोटो काढण्याचीही मुभा देण्यात येईल.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने दोन टप्प्यात ही योजना प्रत्यक्षात आणायची आहे. पहिल्या टप्प्यात 'वॉक वे' चे बांधकाम, तर दुसऱ्या टप्प्यात आर्ट गॅलरी, अॅम्पिथिएटर, म्युझिकल फाऊण्टन्स याची रचना करायची आहे. आमदार किसन कथोरे यांनी हा प्रस्ताव मांडला असून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे.

माळशेज घाट पावसाळ्यात पर्यटकांनी फुललेला असतोच, मात्र वॉक वे बांधल्यावर वर्षाचे 365 दिवस इथे पर्यटकांची गर्दी होईल. जिल्ह्याच्या महसूलात वाढही होईल आणि जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळही विकसित होईल, असं दुहेरी उद्दिष्ट यामुळे साध्य होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com