कल्याण- दुर्गाडी किल्ल्याच्या कामास सुरुवात 

सुचिता करमरकर
मंगळवार, 25 जुलै 2017

कल्याण- ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाच्या ढासळलेल्या भागाने अधिक नुकसान होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आजपासून याठिकाणी हा भाग मोकळा करण्यास सुरुवात केली आहे. प्रत्यक्षात किल्ल्याच्या तटबंदीचे काम एक महिन्याने सुरु होईल असा अंदाज आहे.            

कल्याण- ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाच्या ढासळलेल्या भागाने अधिक नुकसान होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आजपासून याठिकाणी हा भाग मोकळा करण्यास सुरुवात केली आहे. प्रत्यक्षात किल्ल्याच्या तटबंदीचे काम एक महिन्याने सुरु होईल असा अंदाज आहे.            

किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र विहीत प्रक्रिया पुर्ण होऊन प्रत्यक्षात काम सुरु होण्यास महिनाभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या दरम्यान ढासळलेला भाग कोसळून दुर्घटना होऊ नये यासाठी हा भाग हटविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरु केले आहे. दुर्गाडी  किल्ल्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने  नागरिकांकडून नाराजी  व्यक्त करण्यात येत होती.  गेल्या महिनाभराच्या कालावधीत किल्ल्यााचे बुरुज ढासळू लागल्याने सेना पदाधिकाऱ्याांनी याबाबत आंदोलनाचा इशारा दिला होता. कल्याण तहसीलदार आणि जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी या किल्ल्याच्या ढासळलेल्या भागाची पाहणी करून अहवाल तातडीने पाठविण्याचे तसेच डागडुजीकडे लक्ष देण्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाने आदेश दिल्यानंतर तटबंदीसह किल्ल्यावरील मंदिर परिसराच्या डागडुजीसाठी चार कोटी रुपयाच्या निधीचा प्रस्ताव विभागाने तयार केला.  यातील एक कोटी 79 लाख रुपये पहिल्या टप्प्यात मंजूर झाले आहेत. या निधीतून करावयाच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून प्रत्यक्षात दुरुस्तीच्या कामाला महिनाभराचा कालावधी लागणार आहे. मात्र तोपर्यत ढासळलेल्या बुरुजाच्या भिंती कोसळून अपघात होऊ नयेत यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने हे ढासळलेल्या बुरुजाचा मलबा हटविण्याचे काम सुरु केले अाहे. महिनाभरात डागडूजीला सुरुवात केली जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे.  सभागृह नेते राजेश मोरे यांनी शासनाने कामास सुरुवात केली त्याबद्दल शासनाचे आभार मानले.