क्षयाविरुद्धचे युद्ध दिवसेंदिवस कठीण

हर्षदा परब
शुक्रवार, 24 मार्च 2017

'ड्रग रेसिस्टन्स' रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक

'ड्रग रेसिस्टन्स' रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक
मुंबई - क्षयरोगाविरुद्धच्या लढाईत "टी.बी. हारेगा, देश जितेगा' ही चमकदार घोषणा आपण देत असलो, तरी तसा दृष्टिकोन आणि एखाद्या युद्धात आवश्‍यक असलेली चिकाटी आपल्याकडे नसल्याने औषधांना दाद न देणाऱ्या (ड्रग रेसिस्टन्स) क्षयाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. परिणामी, या रोगावर मात करणे अधिकाधिक कठीण होत आहे.

क्षयरोगाचे बदलते स्वरूप शोधण्यासाठी, दर्जेदार आणि स्वस्त औषधांचे उत्पादन करण्यासाठी, ही औषधे रुग्णांपर्यंत पोचवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी आवश्‍यक बांधिलकीच्या अभावामुळे क्षयाविरुद्धच्या युद्धात आपले युद्धकौशल्य कमी पडताना प्रत्ययाला येत आहे.

जुनाट निदान पद्धत
देशात क्षयाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळतात. सरकारी अधिकारी याचे, "इथे तपासणीच्या सुविधा असल्याने जास्तीत जास्त लोकांना क्षय होत असल्याचे उघड होते', असे तांत्रिक समर्थन करतात. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. तपासणीच्या सुविधा पुरेशा आणि अद्ययावत नाहीत. "ड्रग रेसिस्टन्स' क्षयाचे निदान व्हायला वेळ लागतो. राज्यात अनेक ठिकाणी जीन एक्‍स्पर्ट मशिन दिल्या आहेत; मात्र त्यांचा फारसा वापर केलाच जात नाही. थुंकीची तपासणी आणि छातीचा एक्‍सरे या जुन्या पद्धतींद्वारेच आज क्षयाचे निदान केले जाते. अनेक देशांमध्ये एखाद्याला क्षय झाल्याची शंका आल्यास तत्काळ त्याची "ड्रग रेसिस्ट्‌न्स' तपासणी करण्यात येते. मात्र, आपल्याकडे सर्वच रुग्णांसाठी ही निदान पद्धती वापरण्यात येत नाही, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. क्षयाचे निदान झाल्यानंतर रुग्णाची "ड्रग रेसिस्टन्स' चाचणी होणे गरजेचे असते; परंतु ती न करताच उपचार सुरू केले जातात. उपचारांना रुग्ण प्रतिसाद देत नसेल, तरच त्याची ड्रग रेसिस्टन्स चाचणी करण्यात येते. ही परिस्थिती बदलण्याची आवश्‍यकता तज्ज्ञ व्यक्त करतात.

'ड्रग रेसिस्टन्स'चे आव्हान
लागण झाल्यानंतरच्या पहिल्याच टप्प्यात अनेक रुग्णांमध्ये ड्रग रेसिस्टन्स क्षयाची लक्षणे दिसत असल्याचे हिंदुजा रुग्णालयातील छातीविकारतज्ज्ञ डॉ. झरीर उडवाडिया यांनी नुकतेच स्पष्ट केले होते. पहिल्याच टप्प्यात ड्रग रेसिस्टन्स क्षयरुग्ण आढळत असल्याने डॉक्‍टरही चक्रावले आहेत. त्यामुळे क्षयाच्या पहिल्याच चाचणीत "ड्रग रेसिस्टन्स' चाचणीवर भर देण्याची आवश्‍यकता अनेक तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

क्षयाच्या "ड्रग रेसिस्टन्स' या प्रकाराने डॉक्‍टरांसमोर आव्हान उभे केले आहे. या क्षयावर मोठ्या प्रमाणावर संशोधनाची आवश्‍यकता आहे. सध्या जगात "ड्रग रेसिस्टन्स'च्या रुग्णांना परदेशात बेडाक्विलीन आणि डेलामीन ही औषधे देण्यात येतात; मात्र काहींच्या बाबतीत ती निरुपयोगी ठरतात. अशा रुग्णांसाठी वेगळ्या प्रकारच्या कॉम्बिनेशनची किंवा औषधाची आवश्‍यकता आहे. भारतात आजही या दोन औषधांची "ट्रायल' सुरू झालेली नाही; मात्र काही कागदपत्रांची पूर्तता केल्यास कोणत्याही देशातील रुग्णाला ही औषधे मिळू शकतात, असे "मेडिसिन्स सायन्स फ्रॅंटियर्स' या संस्थेतील डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या या संस्थेच्या डॉक्‍टरांनी काही रुग्णांना ड्रग रेसिस्टन्ससाठी वेगवेगळ्या कॉम्बिनेशनची औषधे दिली असता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसली आहे.

"मेडिसिन्स सायन्स फ्रॅंटियर्स' ही संस्था गोवंडीतही काम करते. तेथील अनुभव असा आहे, की क्षयाचे निदान झाल्यानंतर रुग्ण सरकारी रुग्णालयात न जाता खासगी डॉक्‍टरकडे औषधोपचार घेतो. तेथे हजारो, लाखो रुपये खर्च होतात. मग हे रुग्ण औषधोपचार अर्धवट सोडतात. सुमारे 30 टक्के रुग्ण औषधोपचार अर्धवट सोडतात. परिणामी ते "ड्रग रेसिस्टन्स' क्षयाला बळी पडतात.

राज्यातील क्षयरुग्ण
वर्ष मल्टि ड्रग रेसिस्टन्स रुग्ण एक्‍स्टेन्सिव्हली ड्रग रेसिस्टन्स रुग्ण

2015 4740 779
2016 5282 670

दर वर्षी सुमारे एक लाख 30 हजार रुग्ण आढळतात.

मुंबईतील रुग्ण
वर्ष रुग्ण एमडीआर एक्‍सडीआर

2015 38,667 3608 556
2016 42,115 4374 555

Web Title: everyday difficult war against tuberculosis