जेवणावर ताव मारत कुटुंबासाठी दिला वेळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

मुंबई - निवडणूक जाहीर झाल्यापासून इच्छुकांना उमेदवारी मिळवण्याचे टेन्शन होते. उमेदवारी मिळाल्यावर प्रचारासाठी चाललेला आटापिटा... उन्हातान्हात तहान-भूक विसरून केलेला प्रचार... त्यामुळे जेवण-खाण्याकडे आणि कुटुंबाकडे झालेले दुर्लक्ष, अशी महापालिका निवडणुकीत उमेदवारांची अवस्था होती. मंगळवारी मतदान झाल्यानंतर बुधवारी उमेदवारांनी कुटुंबाला वेळ दिला. महिला उमेदवारांनी घरात मुलांबरोबर वेळ घालवला; तर काहींनी आईच्या हातच्या जेवणावर ताव मारत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. निकालाचे टेन्शन बाजूला ठेवून उमेदवारांनी आजचा दिवस आरामात घालवला.

शिवसेनेच्या दहिसर येथील उमेदवार शीतल म्हात्रे यांनी आज दीड महिन्यानंतर घरच्या स्वयंपाकघरात पाऊल टाकले. चांगले तिखटाचे जेवण करत आयजीएससी बोर्डाच्या दहावीला असलेल्या मुलाचा अभ्यास घेतला. उमेदवारांसाठी आजचा दिवस आरामाचा होता. मतदारांवर विश्‍वास आहे, त्यामुळे निकालाचे आज टेन्शन घ्यायचे नाही. एक-दीड महिन्यापासून वडापाव, पुरी-भाजी, मिसळ-पाव असे मिळेल ते खाऊन दिवस काढला; पण आज बुधवार असल्याने मासळीवर ताव मारला, असे म्हात्रे यांनी सांगितले. सातरस्ता येथील भाजपच्या उमेदवार आरती पुगावकर यांचाही आजचा दिवस आरामाचा होता. एक-दीड महिन्यानंतर सकाळी मस्त नाश्‍ता झाला. दुपारीही चिकनचे जेवण झाले. त्यानंतर कार्यालयात जाऊन निवडणुकीच्या खर्चाचा हिशेब जुळवला, असे त्यांनी सांगितले.

मुलुंड येथील मनसेच्या प्रभाग क्रमांक 105 च्या उमेदवार सुजाता पाठक यांनी आज दीड महिन्यानंतर संपूर्ण दिवस पहिलीत असलेल्या मुलीबरोबर घालवला. आई दिवसभर घरी असल्याने मुलगीही खुशीत होती.