एफडीएचा ऑनलाईन धाक 

medicine
medicine

ठाणे - ऑनलाईन औषधांच्या विक्रीला बंदी असली, तरीऑनलाईन औषध विक्रीबाबतच्या जाहिराती वेबसाईटवर आणि सोशल मीडियावर झळकत आहेत. ऑनलाईन औषधविक्रीचा छडा लावण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून (एफडीए) औषधांची ऑनलाईन ऑर्डर देऊन वारंवार सापळा रचला जातो; मात्र ऑर्डरमधील महाराष्ट्राचा पत्ता दिसताच ती रद्द केली जाते. महाराष्ट्रात तत्काळ कारवाई होत असल्याने ऑनलाईन औषध विक्री बंद असल्याचा दावा एफडीएच्या कोकण विभागातील अधिकाऱ्यांनी केला आहे. 

औषध विक्रेत्यांच्या व्यवसायावर गदा आणणारी ऑनलाईन औषध विक्री कधी कधी रुग्णांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे देशपातळीवरील केमिस्ट संघटनेचासुद्धा ऑनलाईन औषधविक्रीला जोरदार विरोध आहे. औषधांची ऑनलाईन विक्री झाल्यास तरुणांमध्ये नशेची प्रवृत्ती वाढेल; शिवाय रुग्णाचे आरोग्य आणि औषधांच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न निर्माण होऊ शकतो. देशातील ग्रामीण भागात जीवनरक्षक औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. याशिवाय लाखो औषधविक्रेते आणि कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर गदा येण्याची भीती केमिस्ट संघटना व्यक्त करत आहेत. ऑनलाईन औषध विक्रीविरोधात केमिस्ट संघटनांनी वारंवार आंदोलने केली आहेत. नुकतेच नोव्हेंबरमध्ये औषध विक्रेत्यांनी देशव्यापी बंदची हाक दिली होती; मात्र नंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

औषधे ऑनलाईन विकणे याबाबत औषधांच्या कायद्यात कोणतीही तरतूद नाही. तसेच ऑनलाईन औषधे विकण्यावर महाराष्ट्रात बंदी असल्याचे एफडीएचे अधिकारी सांगतात. मात्र तरीसुद्धा औषधांची विक्री करणाऱ्या विविध वेबसाईट असून खरेदीवर 20 ते 30 टक्के सूटही दिली जाते. आजकाल ऑनलाईन खरेदीकडे अनेकांचा कल दिसून येतो. परंतु औषधांची ऑनलाईन खरेदी-विक्री धोकादायक ठरू शकत असल्याचे बोलले जात आहे. गतवर्षी ऑनलाईन औषध विक्रीप्रकरणी कारवाई करून एफडीएने स्नॅपडीलचे सीईओ आणि अन्य संचालकांविरोधात पनवेल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर,ऑनलाईन औषधविक्री राज्यात बंद आहे. 

ऑनलाईन औषध विक्रीचा छडा लावण्यासाठी वर्षभरात अनेकदा औषधांच्या ऑर्डर दिल्या. मात्र एफडीएच्या धाकाने औषधांची विक्रीच करण्यात आलेली नाही, असेही पौणीकर यांनी सांगितले. 

एफडीएचे अधिकारी विविध वेबसाईटवर ऑनलाईन औषधांची ऑर्डर देतात. प्रिस्क्रिप्शनसुद्धा अपलोड केली जाते. मात्र महाराष्ट्राचा पत्ता आणि कोड दिसताच ऑर्डर रद्द केली जाते. 
- व्ही.टी. पौणीकर, सहआयुक्त, एफडीएचे कोकण विभाग. 

महाराष्ट्रात औषधांची ऑनलाईन विक्री करताना आढळल्यास कडक कारवाई करण्यात येते. या धाकातून किमान, महाराष्ट्रात तरी ऑनलाईन औषधविक्री बंद असल्याने फार्मसीच्या दुकानांना फटका बसत नाही. 
- अरविंद चौधरी, औषधविक्रेते..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com