रुळांवरील वस्तू शोधण्यासाठी तंत्रज्ञान शोधा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मार्च 2017

मुंबई - रेल्वे मार्गावर रुळांचे तुकडे किंवा अन्य वस्तू टाकून घातपात घडवण्याचा प्रयत्न समाजविघातक शक्तींकडून होऊ शकतो. त्यामुळे असे प्रकार रोखणारे एखादे तंत्रज्ञान उपलब्ध आहे का, याचा शोध घ्या. रेल्वे प्रशासन त्याचा वापर करेल का, याची माहिती द्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 10) दिले. गॅंगमनची संख्या वाढवण्याची तसेच आरपीएफ जवान आणि होमगार्डना रुळांवर 24 तास देखरेख ठेवण्याचे निर्देश देण्याच्या सूचनाही न्यायालयाने केल्या.

प्रवाशांच्या सुरक्षेबाबत समीर झवेरी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर शुक्रवारी न्या. व्ही. एम. कानडे आणि न्या. पी. आर. बोरा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. प्रवाशांच्या जीवाची आणि रेल्वेच्या मालमत्तेची काळजी घेण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कायम दक्ष राहावे, अशा सूचना न्यायालयाने या वेळी केल्या.

रुळांभोवतीच्या संरक्षक भिंती उभारण्याचे काम धीम्या गतीने सुरू असल्याबद्दल खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. प्रवाशांनी रूळ ओलांडण्याचे प्रमाण अधिक असलेल्या परिसरात विशेष लक्ष ठेवावे. गॅंगमनची कायमस्वरूपी भरती करणे शक्‍य नसल्यास ते काम कंत्राटी गॅंगमनच्या मदतीने केले जाऊ शकते, अशी सूचना न्यायालयाने या वेळी केली.

नवी मुंबईतील रुळांशेजारी संरक्षक भिंती उभारण्यासाठी तसेच देखभालीसाठी रेल्वे प्रशासनाने सिडकोला 96.4 कोटी रुपये देऊ केले आहेत. रेल्वेस्थानकांवर वैद्यकीय सुविधा कक्ष उभारण्याचे काम सुरू असून, 12 ठिकाणी हे कक्ष कार्यरत आहेत. पश्‍चिम रेल्वेवरील काही स्थानकांवर असे कक्ष उभारण्यास जागा नाहीत. त्यामुळे तेथील रेल्वेच्या हद्दीत हे कक्ष उभारण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती रेल्वेचे वकील सुरेश कुमार यांनी न्यायालयात दिली. रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांच्या संदर्भात एमव्हीआरसीने सर्वेक्षण केले आहे. त्याचा अहवाल न्यायालयात सादर केला जाईल, असे आश्‍वासनही त्यांनी दिले.

प्रवाशांच्या सुरक्षेत हयगय नको
मुंबईत कोट्यवधी प्रवासी दररोज लोकलने प्रवास करतात. रेल्वे प्रशासनाने त्यांच्या सुरक्षेत हयगय करू नये, असे मत व्यक्त करत न्यायालयाने सुनावणी 17 मार्चपर्यंत तहकूब केली.

Web Title: Find objects in technology railway line