उंदराने वायर कुरतडल्याने चार दुकाने आगीत खाक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

नवी मुंबई - वाशी येथे होलसेल बिस्कीट विक्री करणाऱ्या दुकानात शॉर्टसर्किटने आज पहाटे लागलेल्या आगीत हजारो रुपयांचे नुकसान झाले. उंदरांनी वायर कुरतडल्यामुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

नवी मुंबई - वाशी येथे होलसेल बिस्कीट विक्री करणाऱ्या दुकानात शॉर्टसर्किटने आज पहाटे लागलेल्या आगीत हजारो रुपयांचे नुकसान झाले. उंदरांनी वायर कुरतडल्यामुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातील माथाडी भवनच्या तळमजल्यावर होलसेल बिस्कीट विक्री करणारे लक्ष्मी ट्रेडिंग दुकान आहे. या दुकानात बिस्किटांचा मोठा साठा आहे. प्राथमिक अंदाजानुसार दुकानातील विजेच्या वायर्स उंदरांनी कुरतडल्यामुळे आग लागल्याचा संशय आहे. पहाटे चारच्या सुमारास लक्ष्मी ट्रेडिंगमध्ये आग लागली. ही आग दुकानाच्या शेजारी असलेल्या शिवशक्ती इंटरप्राईज, राजश्री लॉटरी आणि एका पतसंस्थेच्या कार्यालयात पोहोचली. शेजारच्या दुकानात प्लास्टिक ताडपत्री व थर्माकॉल असल्यामुळे ही आग वेगाने पसरली. वाशी अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळाल्यानंतर पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. तब्बल चार तासांनंतर आग आटोक्‍यात आली.