चीनमध्ये निर्यातीमुळे मच्छीमार मालामाल 

चीनमध्ये निर्यातीमुळे मच्छीमार मालामाल 

मुंबई - पावसाने फिरवलेली पाठ आणि लाटांची कमी झालेली तीव्रता, यामुळे मुंबईच्या समुद्रात मच्छीमारांना ‘लेदर जॅकेट’ अर्थात चप्पल माशांची लॉटरी लागली आहे. गेल्या आठवड्यापासून खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटींना प्रत्येक फेरीला सरासरी दोन ते तीन टन  मासे मिळत आहेत. भारतीय बाजारात शून्य किंमत असलेल्या या माशांची चीनमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्याने मच्छीमारांपासून व्यापारी मालामाल झाले आहेत.

भारतीय मासळी बाजारात लेदर जॅकेटकडे खवय्ये ढुंकूनही पाहत नाहीत. त्यामुळे एकेकाळी हा मासा जाळ्यात सापडला म्हणजे डोक्‍याला ताप, अशी मच्छीमारांची भावना होती. त्यामुळे त्याला पुन्हा समुद्रात सोडण्यात येत असे. पण २००८ नंतर परिस्थितीत बदल झाला. भारतीय मच्छीमारांच्या जाळ्यात हे मासे मोठ्या प्रमाणात सापडू लागले असतानाच चीनमधून त्याला मोठी मागणी येऊ लागली. पर्यायाने निर्यातही वाढली. त्याचा फायदा मच्छीमारांना झाला. त्यानंतर लेदर जॅकेट म्हणजे जणू लॉटरी ठरू लागली. ससून डॉक आणि भाऊचा धक्का या दोन्ही बंदरात सुमारे एक हजार पर्सिसनेट आणि ट्रॉलरद्वारे मासेमारी होते. त्यांच्या गेल्या आठवड्याच्या फेरीत प्रत्येकी सरासरी दोन ते तीन टन लेदर जॅकेट सापडले. भारतीय बाजारात शून्य मागणीमुळे कवडीमोल असलेले हे मासे चीनमध्ये चवीने खाण्यात येतात. त्यामुळे त्या देशात निर्यात करण्यात आली, अशी माहिती रायगड जिल्ह्यातील करंजा मच्छीमार सोसायटीचे संचालक गणेश नाखवा यांनी दिली. 

१५ दिवसांपूर्वी २०० ते २२० रुपये प्रति किलोने हे मासे विकण्यात येत होते. आता ते मुबलक प्रमाणात सापडत असल्याने त्याचे दर थोडे घसरले आहेत. या मोसमात त्याची एक हजार टन निर्यात झाली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. 

ट्युना, नळ मासाही मुबलक 
लेदर जॅकेटबरोबर सध्या ट्युना (कुपा) आणि नळ मासाही मुबलक प्रमाणात सापडत आहे. ट्युनाला युरोप, अमेरिकेत चांगली मागणी आहे. त्यामुळे मच्छीमारांची चलती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com