पाच दिवसांत पावणेदोन कोटींचे सोने जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

मुंबई - हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) पाच दिवसांत १० कारवाया करून सुमारे पावणेदोन कोटींचे सोने जप्त केले. अटक केलेल्यांपैकी एक महिला आहे. यंदा एआययूने पाच कोटींचे सोने जप्त केल्याची नोंद आहे.

मुंबई - हवाई गुप्तचर विभागाने (एआययू) पाच दिवसांत १० कारवाया करून सुमारे पावणेदोन कोटींचे सोने जप्त केले. अटक केलेल्यांपैकी एक महिला आहे. यंदा एआययूने पाच कोटींचे सोने जप्त केल्याची नोंद आहे.

नोटाबंदीनंतरही मुंबई विमानतळावर सोने तस्करीत वाढ सुरूच आहे. एआययूने १० ते १४ मार्चदरम्यान सोने तस्करीची १० प्रकरणे उघड करून पावणेदोन कोटींचे सोने जप्त केले. शुक्रवारी (ता. १०) रात्री श्रीलंकेतील कोलंबो येथून आलेली एक महिला सहार विमानतळावर उतरली. तिच्याकडून नऊ लाख ४० हजारांचे सोने जप्त करण्यात आले. सुरतमधील सुरेश भालानी हा हाँगकाँगहून खासगी विमानातून विमानतळावर उतरला. त्याच्याकडे ५१ कॅरेटचे १२० हिरे सापडले. जप्त केलेल्या हिऱ्याची किंमत १५ लाख ५० हजार आहे. भालानी हा एका हिरे निर्यात करणाऱ्या कंपनीत कामाला आहे. तो हाँगकाँगमधील एका हिरे प्रदर्शनाला गेला होता. रविवारी (ता.१२) सुदानमधून आलेल्या अमल एलहाग या महिलेकडून १६ लाख ७० हजारांचे सोने जप्त करण्यात आले. तिचे सुदानमध्ये कपड्यांचे दुकान आहे. सोमवारी (ता.१३) मोहम्मद अब्दुला शेख हा दुबईतून आलेला प्रवासी सहार विमानतळावर उतरला. त्याच्याकडून १० लाख ५७ हजारांचे सोने जप्त करण्यात आले. तो रियाधमधील एका शॉपिंग मॉलमध्ये कामाला आहे. 

मंगळवारी (ता.१४) धवल उपेंद्रकुमार या प्रवाशाकडे २९ लाख ८३ हजारांचे सोने सापडले. धवलची आखाती देशात बांधकामाचे कंत्राट घेणारी कंपनी असून त्याला सोने तस्करी प्रकरणात अटक झाली आहे. मुंबईच्या मदनपुरा परिसरात राहणाऱ्या मोहम्मद अश्रफ अन्सारीकडून ३८ लाखांचे सोने, ६० हजारांचे आयफोन आणि ४३ हजारांचा लॅपटॉप जप्त केला. त्याने म्युझिक सिस्टिममध्ये सोने लपवून आणले होते. त्याला इम्रान अन्सारी नावाची व्यक्ती विमानतळावर भेटण्यासाठी आली होती. मोहम्मद हा खासगी टॅक्‍सी चालवण्याचे काम करतो.

Web Title: five days seized two gold cr