चाळीस टक्के चिमण्यांचे स्थलांतर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

ठाणे - अलीकडे शहरांमध्ये पक्षी पाहायला मिळणे दुरापास्त झाले आहे. कावळा, कबुतर आणि चिमणी हे शहरातील प्रमुख पक्षी. अन्यथा पक्षी पाहायला मिळतात ते पिंजऱ्यातले पोपट आणि लव्ह बर्डस; मात्र या शहरातील मुख्य पक्ष्यांमधून चिमणी हे नावदेखील काढून टाकावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांत सकाळी ऐकू येणारा चिवचिवाट बंद झाल्याने जागतिक स्तरावर याची दखल घेतली गेली. या चिमण्यांना वाचवण्यासाठी 20 मार्च हा जागतिक चिमणी दिन साजरा केला जाऊ लागला.

ठाणे - अलीकडे शहरांमध्ये पक्षी पाहायला मिळणे दुरापास्त झाले आहे. कावळा, कबुतर आणि चिमणी हे शहरातील प्रमुख पक्षी. अन्यथा पक्षी पाहायला मिळतात ते पिंजऱ्यातले पोपट आणि लव्ह बर्डस; मात्र या शहरातील मुख्य पक्ष्यांमधून चिमणी हे नावदेखील काढून टाकावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांत सकाळी ऐकू येणारा चिवचिवाट बंद झाल्याने जागतिक स्तरावर याची दखल घेतली गेली. या चिमण्यांना वाचवण्यासाठी 20 मार्च हा जागतिक चिमणी दिन साजरा केला जाऊ लागला. अनेक संस्थांच्या माध्यमातून चिमणी वाचवण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जाऊ लागले आहेत; मात्र तरीही गेल्या काही वर्षांत मुंबई, ठाणे शहरातील सुमारे 40 टक्के चिमण्या कमी झाल्याची माहिती पक्षितज्ज्ञ डॉ. सुमेधा गिरी यांनी दिली आहे. 

शहरामध्ये कमी झालेल्या या चिमण्या काही प्रमाणात इमारतींच्या जंगलातून नैसर्गिक वनराईकडे स्थलांतरित झाल्या आहेत. त्यामुळे जंगल असलेल्या व झाडे असलेल्या भागामध्ये चिमण्या मोजल्यास त्यांचे जास्त प्रमाण दिसून येते; मात्र इमारती व वसाहतींमध्ये झाडे अजिबात नसल्याने चिमण्या तिथून कमी होत चालल्या आहेत. चिमणी हा तसा भित्रा आणि सजग पक्षी आहे. त्यामुळे मोडकळीस आलेल्या किंवा धोकादायक इमारतीमध्ये घरटे करत नाही. घरटे बांधताना ती तिची सुरक्षितता तपासून घेते. सिमेंटच्या जंगलांमुळे त्यांना पिण्यास पाणी नाही. धुळीमध्ये खेळायला उघडी जमीनच मिळत नाही. पूर्वी रस्त्यावर किराणा मालाची दुकाने असत. बाहेर असलेले धान्य खायला मिळत असे. आता दुकाने एअर कंडिशन झाल्याने त्यांचे खाद्य बंदिस्त झाले आहे. दारावर लावली जाणारी भाताची तोरणे कमी झाली आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शहरामध्ये मोबाईल टॉवर्सच्या वाढत्या इलेक्‍ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा त्यांच्या जीवनमानावर परिणाम होत आहे. या कारणांमुळे चिमण्यांनी आपले घरटे वृक्षराजी असलेल्या भागामध्ये हलविल्याचे अभ्यासातून दिसत आहे. 

Web Title: Forty percent of the sparrow migration