मुंबई पोलिसांसाठी आणखी चार सायबर सेल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

मुंबई - मुंबई पोलिसांना चार नवीन सायबर सेल व एक सायबर प्रशिक्षण केंद्र मिळणार आहे. त्यासाठी 186 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. राज्य सरकारने या प्रस्तावाला बुधवारी मंजुरी दिली. 

मुंबई - मुंबई पोलिसांना चार नवीन सायबर सेल व एक सायबर प्रशिक्षण केंद्र मिळणार आहे. त्यासाठी 186 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. राज्य सरकारने या प्रस्तावाला बुधवारी मंजुरी दिली. 

मुंबईत सध्या एक सायबर सेल आहे. त्याच्यासोबत आणखी चार सायबर सेलना राज्य सरकारने मंजुरी दिली. याशिवाय 100 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देणारे केंद्र उभारण्यासही मंजुरी देण्यात येणार आहे. सायबर सेलसाठी दोन सहायक पोलिस आयुक्त, 24 पोलिस निरीक्षक, 40 सहायक पोलिस निरीक्षक, 120 पोलिस शिपाई नेमले जातील. या पदांची निर्मिती व प्रशिक्षण केंद्रासाठी 14 कोटी 59 लाख 56 हजारांच्या खर्चालाही सरकारने मंजुरी दिली. 

सध्या वांद्रे-कुर्ला संकुलात एक सायबर पोलिस ठाणे आहे. आर्थिक गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी एक सायबर सेलही मुख्यालयात आहे. याशिवाय सर्व पोलिस ठाण्यांनाही त्यांच्या हद्दीतील सायबर गुन्हे दाखल करण्यास सांगण्यात आले आहे. त्यांना सायबर पोलिस ठाण्याकडून तपासात मदतही करण्यात येते; पण अनेकदा स्थानिक पोलिस ठाण्यांकडून सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी घेऊन आलेल्यांना सायबर पोलिसांकडेच पाठवले जाते. त्यामुळे सायबर पोलिसांवर सध्या मोठा भार आहे. नवीन निर्णयामुळे हा भार कमी होण्यास मदत होईल.