ठाणे चौपाटीसाठी निधी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

मुंब्रा ते कळव्यादरम्यानच्या खाडीकिनाऱ्याचा विकास मार्गी लागला आहे... 

ठाणे -  मुंब्रा ते कळव्यादरम्यानच्या खाडीकिनाऱ्याचा विकास करण्यासाठी ठाणे पालिकेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सुशोभीकरणाच्या कामासाठी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी पर्यटन विकासाचा भाग म्हणून दोन कोटींचा निधी पालिकेकडे सुपूर्द केला आहे. याचबरोबर जिल्हा प्रशासनाच्या वतीने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळावी म्हणून ३० कोटींची मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारकडे केली आहे.

जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्याला मान्यता मिळावी, यासाठी मंत्रालयात वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत  जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी रेतीबंदर चौपाटीसारख्या प्रकल्पाला मंजुरी मिळावी, यासाठी सादरीकरण केले. ठाणे शहराच्या दृष्टीने प्रकल्पाचे महत्त्व त्यांनी बैठकीत पटवून दिले.  

मध्यंतरी या खाडीकिनाऱ्यावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी जिल्हा प्रशासनासमवेत संयुक्तरीत्या मोहीम हाती घेतली होती. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन रेती उत्पादक सोसायटीसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेऊन रेतीबंदर चौपाटीच्या सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा केला होता.

मुंब्रा-खारेगाव-कळवा दरम्यानच्या रेतीबंदर परिसरामध्ये विस्तीर्ण खाडीकिनारा आणि लगत उंच डोंगररांगा असा निसर्गाचा अनमोल ठेवा पाहायला मिळतो. काही वर्षांमध्ये खाडीकिनाऱ्यावर होणाऱ्या अतिक्रमणामुळे या भागातील सौंदर्य नष्ट होण्यास सुरुवात झाली होती. रेतीबंदर भागात रेतीउपसा करणाऱ्या व्यावसायिकांनी सहकारी सोसायटी स्थापन करून खाडीकिनाऱ्यावरील जागा रेती साठवणुकीसाठी मागितली होती. त्यानुसार महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डातर्फे त्यांना भाडेपट्ट्याने ही जागा सोसायटी व रेती उत्पादक व्यावसायिकांना दिली होती. या ठिकाणी स्थानिक नागरिक रेती साठवणूक करत होते. कालांतराने हा व्यवसाय बंद होऊन तेथे गॅरेज, हॉटेल्स, वर्कशॉप्स अशी दुकाने सुरू झाली आणि हा परिसर खूप बकाल झाला. अतिक्रमणांमुळे परिसराची रया गेली होती.

ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रेतीबंदर परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे आणि व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्याची मागणी मान्य केली. नागरिकांचे बीएसयूपी योजनेंतर्गत पुनर्वसन झाले आहे. रेतीबंदरला समांतर ४० मीटरचा सेवा रस्ता तयार करून चौपाटी सज्ज होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार त्यांनी दोन कोटींचा निधी दिल्यामुळे या प्रकल्पाला अधिक गती मिळाली आहे.

पालिकेच्या अर्थसंकल्पात विशेष तजवीज
खाडीकिनारी बनवण्यात येणारी चौपाटी ही पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासाठी एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. येथील अतिक्रमणे तोडताना ते जातीने हजर होते. जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेल्या निधीबरोबरच येथे मोठ्या प्रमाणावर खर्च होणार असल्याने पालिकाही यात सहभागी होणार असल्याचे कळते. त्यामुळे पुढील अर्थसंकल्पात यासाठी विशेष निधी उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे. पालिका हा निधी कशा प्रकारे उपलब्ध करणार, याबद्दल उत्सुकता आहे.

Web Title: funding for the beach