ठाण्यातील गणेश विसर्जन घाटांवर स्वयंसेवकांची वसुली

श्रीकांत सावंत
रविवार, 27 ऑगस्ट 2017

  • मुर्ती विसर्जनासाठी शंभर तर निर्माल्य विसर्जनासाठी वीसची बिदागी
  • महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या देखत गणेशभक्तांची लुटमार

ठाणे : ठाणे शहरातील गणेश विसर्जनासाठी ठाणे महापालिका प्रशासनाकडून विनामुल्य विसर्जन व्यवस्था सुरू केली असताना शहरातील काही कथित स्वयंसेवकांनी या विसर्जन घाटांवर अनधिकृत पध्दतीने वसुली सुरू केली आहे. गणपती विसर्जनासाठी मुर्ती दिल्यानंतर त्याच्या विसर्जनासाठीचे शंभर रुपयांची बिदागी मागितली जात असून ती दिल्याशिवाय भाविकांना त्यांचे पाटही परत दिले जात नाही. येवढ्या उत्साहामध्ये गणेशोत्सव साजरा करत असताना शंभर रुपयांसाठी कोणत्याही प्रकारचा विचार न करता भाविकही त्यांना पैसे देतात. परंतु काहींची इच्छा नसतानाही त्यांच्याकडून ही वसुली केली जात असून काहींची थेट अडवणूक केली जाते. मुर्तीचे निर्माल्यही घेऊन जाणाऱ्यांकडून दहा ते वीस रुपयांची बिदागी मागितली जात असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे महापालिका अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली होणाऱ्या या विसर्जन घाटावरील वसुलीकडे प्रशासकीय व्यवस्था डोळे झाक करत असल्यामुळे नागरिकांचा संताप होत आहे. 

गणेशचतुर्थीला मोठ्या थाटामध्ये प्राणप्रतिष्ठा केलेल्या गणेशाच्या विसर्जनाचा क्षण येऊन ठेपला असताना विसर्जनासाठी ठाणे महापालिकेने जय्यत तयारीचा दावा केला आहे. शहरात विविध ठिकाणी विसर्जन महाघाट, कृत्रिम तलाव आणि मुर्ती स्विकृती केंद्राची उभारणी केली असून शनिवारी दिड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी विसर्जन घाटांवर मुर्ती विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांसमोर काही राजकीय नेत्यांच्या  नावाच्या आणि छायाचित्रांचे टिशर्ट घातलेले कथीत स्वयंसेवक पुढे येऊन या भाविकांना मदतीचा बाहाणा करत होते. विनामुल्य विसर्जन व्यवस्था असल्यामुळे तसेच सगळी प्रशासकिय यंत्रणा या भागात असल्यामुळे भाविकही आपल्या मुर्त्या या मंडळींकडे विसर्जनासाठी देतात. ही मंडळी तलावामध्ये गणपतीच्या मुर्त्यांचे विसर्जन करत असून त्यानंतर भाविकांकडे थेट पैशांची मागणी करतात. काहीजण त्यांना पैसे देत असले तरी काही मंडळांनी त्यास नकार दिल्यास त्यांचा गणपतीचा पाटही त्यांना परत दिला जात नाही. याची महापालिका अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यासाठी नागरिक गेल्यानंतर 'हे लोक आमचेही ऐकत नाहीत' असा हतबलता हे अधिकारीही व्यक्त करत असल्यामुळे भाविकांकडून अश्चर्य व्यक्त केले जात आहे. शनिवारी सायंकाळी विसर्जनासाठी तलावपाळी परिसरातील घाटावर गेलेल्या अनेक गणेशभक्तांना याचा चांगलाच फटका बसला. विशेष म्हणजे हा निधी महापालिका प्रशासनाकडे जमा होत की, कोणी माफीय यावर हात मारतो. याचाही भाविकांना पत्ता लागत नाही. त्यामुळे या विरोधात अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या विषयी ठाणे महापालिका जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

भाविकांना वेढीस धरून खंडणी वसुली...
ठाणे महापालिकेस पैसे आकारायचे असतील तर विनामुल्य विसर्जन व्यवस्था हा शब्दप्रयोग महापालिकेने थांबवावा. तसेच भाविकांकडून स्वइच्छेने जर निधी घ्यायचा असेल तर तसे फलक तेथे लावावे आणि एखादा डब्बा ठेवून त्यात पैसे घ्यावे, नागरिकांकडून विनाकारण दमदाटी करून, त्यांना वेढीस धरून होणारी वसुली चुकीची असल्याची मते, ठाण्यातील या घटनेचा अनुभव घेतलेले भाविक प्रशांत ठोसर यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केले आहे.

राजकिय मंडळींच्या नावाचा गैरवापर...  
ठाण्यातील तलावपाळी परिसरामध्ये वसुली करणारे कथीत स्वयंसेवक शहरातील बड्या राजकीय नेत्यांचे छायाचित्र असलेले टिशर्ट घालून हा उद्योग करत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये या नेत्यांबद्दलची नकारात्मक भावना निर्माण होत असून या नेत्याचा या वसुलीस पाठिंबा असल्याचा गैरसमजही पसरू लागला आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनीही याकडे लक्ष देण्याची गरज असून हा गैरप्रकार थांबण्यासाठी लक्ष घालण्याची गरज आहे.
महेंद्र मोने, सामाजिक कार्यकर्ते