पोलिसांसाठी घाटकोपरमध्ये स्मार्ट टाउनशिप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

मुंबई - पोलिसांच्या घराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी घाटकोपरमध्ये "स्मार्ट टाउनशिप‘ उभारण्यात येणार आहे. पोलिसांसाठी असलेली ही देशातील पहिलीच टाउनशिप असेल. तसेच निवृत्त पोलिसांसाठी महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत उपचार मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. 

मुंबई - पोलिसांच्या घराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी घाटकोपरमध्ये "स्मार्ट टाउनशिप‘ उभारण्यात येणार आहे. पोलिसांसाठी असलेली ही देशातील पहिलीच टाउनशिप असेल. तसेच निवृत्त पोलिसांसाठी महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत उपचार मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. 

महाराष्ट्र पोलिस आणि एशियन हार्ट इन्स्टिट्यूटच्या वतीने नायगाव येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी झटणाऱ्या कित्येक पोलिसांना हक्काची घरे नाहीत. त्यांना घरे मिळावीत, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. नव्याने आभारल्या जाणाऱ्या टाउनशिपमध्ये आरोग्य, शिक्षण या सुविधा उपलब्ध असतील. पोलिस वसाहतींची दुरवस्था ही चिंतेची बाब असून, ब्रिटिशकालीन वसाहती असल्याने त्यांची डागडुजी शक्‍य नाही. तेथे पुनर्विकासाच्या माध्यमातून घरे उभारली जातील. मुंबईत पोलिसांसाठी मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

एशियन हार्ट इन्स्टिट्यूटच्या वतीने पोलिसांच्या पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने आरोग्यविषयक तपासण्या केल्या जाणार आहेत. या तपासण्यांचा डिजिटल रेकॉर्ड ठेवण्यात येणार असून, त्याचा फायदा पोलिसांना होणार आहे. त्याचप्रमाणे नोव्हेंबरपासून राज्यात महात्मा फुले आरोग्य योजना राबवली जाणार असून, त्याचा फायदा निवृत्त पोलिसांनाही मिळणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. पोलिसांवर हल्ले झाल्यास त्या प्रकरणांची सुनावणी जलदगती न्यायालयात होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

पोलिसांसाठी हाती घेतलेले उपक्रम 
- हल्ल्यात पोलिसाचा मृत्यू झाल्यास त्याला हुतात्म्याचा दर्जा देणार 
- हल्ले रोखण्याकरिता बॉडी कॅमेरा हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबवणार 
- वायरलेस पद्धतीत बदल करून वाहतूक पोलिसांशी जोडणार 
- पोलिसांच्या पत्नींना स्कील डेव्हलपमेंट कार्यक्रमातून रोजगार 
- पोलिस भरती प्रक्रियेत 5 टक्के आरक्षणासाठी अभ्यास सुरू 
- ऑक्‍टोबरपासून शहरात सीसीटीव्हीचे नेटवर्क सुरू करणार