सीबीएसईत मुलींची बाजी; मेघना श्रीवास्तव देशात प्रथम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेतही पुन्हा एकदा मुलींनी वर्चस्व कायम राखले आहे. नऊ जणांच्या गुणवत्ता यादीत तब्बल सात मुलींनी स्थान पटकाविले आहे. नोएडातील मेघना श्रीवास्तव 500 पैकी 499 गुण मिळवून देशात प्रथम आली. या परीक्षेचा निकाल 83.1 टक्के लागला आहे. 

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेतही पुन्हा एकदा मुलींनी वर्चस्व कायम राखले आहे. नऊ जणांच्या गुणवत्ता यादीत तब्बल सात मुलींनी स्थान पटकाविले आहे. नोएडातील मेघना श्रीवास्तव 500 पैकी 499 गुण मिळवून देशात प्रथम आली. या परीक्षेचा निकाल 83.1 टक्के लागला आहे. 

मार्च-एप्रिल महिन्यांत झालेल्या सीबीएसई बारावी परीक्षेत देशभरातून 11 लाख 6 हजार 772 विद्यार्थी बसले होते. त्यातील 9 लाख 18 हजार 763 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षीप्रमाणे निकालावर यंदाही मुलींनीच छाप पाडली असून, 88.31 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 78.99 इतकी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल 1 टक्‍क्‍याने वाढला आहे. परीक्षेत 498 गुण मिळवत अनुष्का चंद्रा हिने दुसरा क्रमांक पटकाविला आहे, तर 497 गुण मिळवून चाहत बोधराज तिसऱ्या क्रमांकावर राहिली. दिव्यांगांमध्ये 492 गुण मिळवून विजय गणेश प्रथम आला. पूजा कुमारी दुसरी आली आहे, तिला 498 गुण मिळाले आहेत. 

वाणिज्य शाखेवर मुंबईचा झेंडा 
वाणिज्य व विज्ञान शाखेवर मुंबईतील मुलांनी झेंडा फडकविला आहे. सांताक्रूझच्या पोदार स्कूलमधील अर्पित सिंग 98.6 टक्के गुण मिळवीत विज्ञान शाखेत "टॉपर' ठरला, तर याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेतही यशस्वी कामगिरी केली असल्याचा दावा शाळेने केला आहे. दरम्यान, मुंबईतील विद्यार्थ्यांबाबत मंडळाने अधिकृत कोणतीही माहिती जारी केलेली नाही. 

"त्रिवेंद्रम' विभागाची बाजी 
बारावी निकालामध्ये यंदा त्रिवेंद्रम विभागाने बाजी मारली आहे. त्रिवेंद्रमचा निकाल सर्वाधिक म्हणजे 97.32 टक्के लागला आहे. त्या पाठोपाठ महाराष्ट्राचा समावेश असलेल्या "चेन्नई' विभागाने बाजी मारली आहे. चेन्नई विभागाचा निकाल यंदा 93.87 टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत चेन्नईच्या निकालात सुधारणा झाली, तर तिसऱ्या स्थानावर दिल्ली असून, एकूण निकाल 89 टक्के लागला आहे. 

95 टक्के मिळणारे अधिक 
यंदा निकालाच्या टक्‍क्‍यांमध्ये वाढ झाली असून 95 टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. यंदा 12 हजार 737 विद्यार्थ्यांनी 95 टक्के गुण मिळविले आहेत. गतवर्षी हे 10 हजार 91 विद्यार्थ्यांना इतके गुण मिळवले होते, तर 2016 मध्ये हे प्रमाण 9 हजार 351 इतक्‍या विद्यार्थ्यांनी 95 टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळविले होते. 

परकी विद्यार्थ्यांची कामगिरी 
या परीक्षेत विदेशी विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यंदा 15 हजार 674 विदेशी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी 14 हजार 881 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विदेशी विद्यार्थ्यांचा निकालाचा टक्का 94.94 टक्के इतका आहे. गेल्या वर्षी विदेशी विद्यार्थ्यांचा निकालाचा 92.02 टक्के इतका होता. 

संस्थानिहाय निकाल 

  • सरकारी अनुदानित : 84.48 टक्के 
  • सरकारी : 84.39 टक्के 
  • स्वतंत्र : 82.50 टक्के 
  • जे.एन.व्ही : 97.07 टक्के 
  • केंद्रीय विद्यालय : 97.78 टक्के 
Web Title: Girls top in CBSE 12th results