गोव्यातील नववर्ष पार्ट्या रडारवर!

गोव्यातील नववर्ष पार्ट्या रडारवर!

अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी हवाई गुप्तचर विभाग दक्ष
मुंबई - नववर्षाच्या पूर्वसंध्येला गोव्यात जोरदार सेलिब्रेशन होते. नाताळपासूनच रंगत असलेल्या पार्ट्यांमध्ये अमली पदार्थ आणि विदेशी मद्याचे पाट वाहत असतात. म्हणूनच हवाई गुप्तचर विभाग (एआययू) सतर्क झाला असून, तस्करी रोखण्यासाठी गोवा आणि मुंबई विमानतळावर येणाऱ्या परदेशी पर्यटकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. गोव्याकडे रवाना होणाऱ्या सर्वच प्रवाशांच्या सामानाची कसून तपासणी होणार आहे.

दरवर्षी नाताळनंतर गोव्यात नववर्ष स्वागताच्या पार्ट्या रंगतात. अनेक उद्योजक, बॉलिवूडची मंडळी आणि परदेशी पर्यटक त्यात मोठ्या संख्येने सहभागी होतात. सेलिब्रेशनच्या माहोलमध्ये मद्यासोबतच अमली पदार्थांची कोट्यवधीची विक्री होते. नाताळच्या वेळी गोव्यात मोठा जल्लोष असतो.

तेथील हॉटेल-पबमध्ये परदेशी पर्यटकांची संख्या अधिक असते. त्याचा फायदा अमली पदार्थ तस्कर घेतात. व्यवसायाच्या दृष्टीने परदेशातून मोठे तस्कर नाताळपूर्वी गोव्यात दाखल होतात. अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी गोवा पोलिसांसोबतच आता "एआययू'ने कंबर कसली आहे.

खासगी विमानातून अमली पदार्थांची तस्करी होण्याची दाट शक्‍यता असल्याने "एआययू'ने खास भरारी पथके नेमली आहेत. नाताळ आणि 31 डिसेंबरदरम्यान रशिया आणि युरोपातील पर्यटक गोव्यात मोठ्या प्रमाणात येतात. दिल्लीमार्गे ते मुंबईला येतात. मुंबईहून खासगी छोट्या विमानांनी ते गोव्याला जातात. परिणामी चार्टर्ड विमाने "एआययू'च्या रडारवर आहेत.

अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी "एआययू'ने आराखडा तयार केला आहे. खासगी विमानाने गोव्याला जाणाऱ्या नियमित आणि अनियमित प्रवाशांवर करडी नजर ठेवली जाणार आहे. कारवाईसाठी अधिकाऱ्यांची चार पथके तैनात आहेत. विमान उड्डाणापूर्वी काही तास प्रवाशांची यादी गुप्तचर विभागाला मिळते. त्यानंतर अधिकारी जाऊन तपासणी करतात. नाताळ आणि 31 डिसेंबरला गोव्यात जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाची कसून तपासणी केली जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

"क्रू मेंबर'वर विशेष लक्ष
चार्टर्ड विमाने पर्यटकांना सोडण्यासाठी गोव्यात जातात. परतीच्या प्रवासात मात्र विमानात क्रू मेंबर असतात. तस्करांच्या रॅकेटकडून क्रू मेंबरचा गैरवापर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे "एआययू' क्रू मेंबरवरही खास लक्ष ठेवणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com