पाण्याची जबाबदारी सरकारचीच

water
water

सामान्य मतदारांना पालिका प्रशासनाकडून नेमके काय हवे आहे, हे जाणून घेण्याचा ‘सकाळ’चा प्रयत्न आहे. काही जाणकार, तज्ज्ञ, सेलिब्रिटी अन्‌ लोकप्रतिनिधी ‘सकाळ’च्या परळ कार्यालयात येऊन विविध विषयांवर मते मांडत आहेत. पाण्यासारख्या गंभीर विषयावर  झालेल्या चर्चासत्रातूनही अनेक मुद्दे पुढे आले...

मुंबईत ज्या ज्या व्यक्तीला गरज आहे तिला पाणी मिळायला हवे. मग तो अनधिकृत घरात राहणारा का असेना, त्याची पाण्याची गरज भागली गेली पाहिजे, अशी भूमिका महापालिकेने ठेवायला हवी. पाण्याच्या वाटपात विषमता होता कामा नये; मात्र नागरिकांनीही तितक्‍याच जबाबदारीने पाण्याचा वापर करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रशासनाने पाणीवापराची विशिष्ट मर्यादा ठरवायला हवी किंवा जादा वापरावर कर आकारायला हवा. महापालिकेची पाणीयंत्रणा आशियात सर्वोत्तम असल्याने तिचे खासगीकरण न करता मजबुतीकरण केले पाहिजे, अशा महत्त्वाच्या सूचना मान्यवरांनी मांडल्या. ‘सकाळ’तर्फे मुंबईतील पाण्याच्या विषयावर झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते.

पाणी विषयावर काम करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सीताराम शेलार, शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर, अभिनेते अरुण कदम आणि प्रल्हाद कुडतरकर आदी मान्यवर चर्चासत्रासाठी उपस्थित होते. गरजू माणसाला पाणी द्यायला हवे, हे साधे समीकरण आहे; पण पाण्यावर राजकारण होते हे दुःखद आहे, असे मत ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकाफेम अभिनेते प्रल्हाद कुडतरकर यांनी व्यक्त केले. लालबाग-परळमध्ये एकीकडे चाळीतील रहिवाशांना पाण्यासाठी हंडा घेऊन बाहेर पडावे लागते आणि टोलेजंग टॉवरसाठी मात्र भरपूर पाणी मिळते, हे समीकरण विचित्र आहे, असे ते म्हणाले.

पाण्याशी संबंधित गुन्हे घडतात; पण पोलिस ठाण्यापर्यंत ते पोचत नाहीत. पाणी जपून वापरण्याचीही सर्वांची तितकीच जबाबदारी आहे. 

घर अधिकृत असो किंवा अनधिकृत, सर्वांना पाणी मिळणे गरजेचे आहे. पाणीकपात असली तरी दूरदृष्टी ठेवून त्याचे नियोजन सरकारने करणे गरजेचे आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते सीताराम शेलार यांनी व्यक्त केले. झोपडी भागात पाणीपट्टी चुकवली जाते, हा गैरसमज आहे, असेही शेलार म्हणाले. झोपडीवासीय प्रामाणिकपणे पाणीपट्टी भरतात. त्यामुळे झोपडीवासीयांविरोधातला असलेला पाणीपट्टी थकबाकीचा आरोप चुकीचा आहे, असेही त्यांनी सांगितले. पाण्याशिवाय काहीच नाही. आवश्‍यक तितकेच पाणी वापरा, असा संदेश मराठी विनोदी अभिनेते अरुण कदम यांनी दिला. नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनीही स्वस्त आणि पुरेपूर असा पाणीपुरवठा महापालिकेकडून केला जात असल्याचे मत मांडले.

पालिकेची यंत्रणा उत्तम
सीताराम शेलार (सामाजिक कार्यकर्ता)

मुंबईची पाणीवाटपाची यंत्रणा ब्रिटिशकालीन असली तरीही ती अद्ययावत आहे. पाणी व्यवस्थापनात मुंबई महापालिका अग्रस्थानी आहे. संपूर्ण आशियात मुंबई महापालिकेचे व्यवस्थापन उत्तम आहे. अगदी सिंगापूरच्या तोडीस तोड आहे. विभागामार्फत पुढच्या २० ते २५ वर्षांसाठीचे नियोजन करून दूरदृष्टीने काम करण्यात आले आहे, हे अभिमानास्पद आहे.

मनुष्यबळाअभावी कायम जल विभागाचे खच्चीकरण करण्यात आले आहे. १५ वर्षांपासून महापालिकेतील भरती स्थगित करण्यात आली आहे. निवृत्त होण्याच्या बेतात असलेल्या अधिकाऱ्यांची रवानगी जल विभागात होते. त्यामुळे विभागाला नेतृत्व नाही अशीच स्थिती अनेक वर्षांपासून आहे. शहर वाढते आहे; पण वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सेवा पुरवण्यासाठी तितकेसे मनुष्यबळ जल विभागात नाही.

नागरिकांना नको तो माज
शहरातल्या नागरिकाला पाणी वाचविण्याबाबत काही देणेघेणे नाही, याची खंत आहे. पाण्याची नासाडी करणारे नागरिक माजलेले आहेत, असे खेदाने म्हणावे लागते. मी पाण्याचे बिल देतो तर ते वाटेल तसे वापरणार, अशी काही जणांची मानसिकता आहे. ९७ टक्के मुंबईचे पाणी बाहेरून येते. तीन टक्के पाणी मुंबईच्या तलावांतून येते. त्या तलावांचीही काळजी घेतली जात नाही. पवई, विहार आदी तलावांची विविध प्रकल्पांमुळे दुरवस्था झाली आहे. शहरातील २२७ तलाव, साडेचार हजार ते सहा हजार विहिरी आणि चार नद्यांची काळजी घेण्यात आलेली नाही. तलावांच्या परिसरातील काँक्रीटीकरण हे मारक आहे. काँक्रीटीकरणामुळे पावसाचे पाणी झिरपणे बंद होते. त्यामुळेच असे सुशोभीकरण आणि काँक्रीटीकरण टाळल्यास पावसाचे पाणी अधिक झिरपण्यास मदत होऊ शकेल.

बांधकामासाठीही पिण्याचे पाणी
मुंबईत पाण्याचे विषम वाटप होते आणि विषम पद्धतीने करही आकारण्यात येतो. दहा इमारतींना तरणतलावाची परवानगी दिलेली आहे. महापालिका पाण्यासाठी अनुदान देते. पाण्याच्या वापरानुसार दर ठरलेले नसल्याने पाणीवापराचे महत्त्वच लोकांना कळत नाही. अनेक ठिकाणी बांधकामासाठीही पिण्याचे पाणी वापरले जाते ही खंत आहे. माणसाला दररोज ५० लिटर पाणी लागते. प्रतिमाणसी पाणी वापरासाठीचा १३५ लिटरचा निकष आहे. महापालिकेत झोपडपट्टी पातळीवर ४५ लिटर आणि इमारतींसाठी कमाल १४५ लिटर पाण्याचा निकष मंजूर आहे. मानवतेच्या आधारावर महापालिकेने आतापर्यंत सरकारी वा खासगी आस्थापनांनाही पाणी दिले आहे. झोपडपट्टीतच पाण्याची चोरी होते हा गैरसमज आहे. झोपडी भागात पाण्याची जोडणी देण्यात येत नाही. त्यामुळेच राजकीय पक्ष कार्यकर्ते याचा फायदा घेतात आणि यातूनच पाणीमाफिया तयार होतात. झोपडीवासीय पाणी बिल भरत नाहीत हा दुसरा गैरसमज आहे. सरकारी आणि खासगी आस्थापना हे कोट्यवधीचे थकबाकीदार आहेत.

पाण्याच्या समान वाटपासाठी कायदा हवा
सचिन तेंडुलकर पाणीबचतीचा ब्रॅण्ड ॲम्बेसिडर होतो आणि पाणीबचतीचा संदेश देतो. दुसरीकडे प्रियंका चोप्रा, दीपिका पदुकोण आदींसारख्या अभिनेत्री साबणाच्या जाहिरातीत पाण्याचा वापर करतात. हा मार्केटिंगचा प्रकार आहे. म्हणूनच महापालिकेनेही पाणीबचतीसाठी आक्रमक पद्धतीने मार्केटिंग करण गरजेचे आहे. मूलभूत गरजांच्या वापरासाठी पाणी पुरवणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे; पण पाण्यासाठी महाराष्ट्रात कोणताच कायदा नाही. म्हणूनच पाण्यासाठी कायदा होणे गरजेचे आहे. पाण्याचे समान वाटप होण्यासाठी त्याचा फायदा होईल.

पाण्याचा गैरवापर नको
अरुण कदम (अभिनेता)

रस्तेदुरुस्ती गैरव्यवहारात जेव्हा दोन मुख्य अभियंत्यांना अटक झाली तेव्हा मला व्यक्तिश: प्रचंड दुःख झाले. रस्तेबांधणी हे शास्त्र आहे. त्यात हयगय केली तर चांगले परिणाम दिसत नाहीत. त्यासाठी प्रत्येक कामात व्हिजिलन्स ठेवण्याबरोबरच सर्व यंत्रणांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. महापालिकेतील रस्त्याचे काम करणारे अधिकारी गाडीतून फिरतात. हे अधिकारी रस्त्याने फिरले, तरच त्यांना रस्त्याची अवस्था कळू शकेल. 

‘१९१६’ क्रमांकावर तक्रार करा
मी पूर्वी एक उपक्रम केला होता. ज्या इमारतीत पाणीगळती होत असे, तिथे मी एक फलक लिहीत असे. पाणीगळती असेल, तर पुढील क्रमांकावर प्लंबरशी संपर्क साधा, असा तो फलक होता. आता १९१६ क्रमांकावर पाणीगळतीची तक्रार करायची असेल, तर तो महापालिकेचा चांगलाच उपक्रम आहे. खरे पाहता, पाणीसमस्या काय किंवा अन्य प्रश्‍न काय... ते निर्माणच होऊ नयेत म्हणून मतदारांनी जागरूक राहायला हवे. भावनिक होऊन मतदान करू नये. काम करणाऱ्यालाच मत द्यावे. मतदानावर बहिष्कारही घालू नये.

पाण्यासंबंधित गुन्हे नोंदवायला हवेत
प्रल्‍हाद कुरतडकर (अभिनेता)

यंदा पाऊस पडलाय तर भरपूर पाणी वापरू... पाणीकपात कशासाठी, असा सामान्य माणसाला नेहमी पडणारा प्रश्‍न आहे. सर्वसामान्य माणूस म्हणून आपण पाणी आणि पावसाचा इतकाच विचार करतो. कितीही पाऊस पडला तरी हिवाळ्यात पुन्हा पाण्याची अडचण जाणवायला लागते. लालबाग-परळसारख्या भागात आजही रहिवाशांना पाणी मिळविण्यासाठी हंडा घेऊन फिरावे लागते. मुंबईत रोजच उभ्या राहत असलेल्या टोलेजंग इमारतींना मात्र भरपूर पाणी मिळते. हे कसे? त्यावर उपाय शोधला पाहिजे. पाणी पुरवून वापरण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. पाण्याचा योग्य वापर करण्याची प्रत्येकाला सवय लागली पाहिजे. काही ठिकाणी वरच्या मजल्यावर पाणी चढत नाही म्हणून रहिवासी मोटर लावतात. त्या हिशेबाने मोटर लावणे ही गरज आहे; पण खरे पाहता तो गुन्हा आहे. पाण्यासंबंधित गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल होत नाहीत, ही खंत आहे. 

पाणीवापरानुसार कर लावणार 
किशेारी पेडणेकर, (नगरसेविका, शिवसेना)
ठाण्यात वेंडेक्‍स मंथन  

ठाणे , ता.१९ : लघुत्तम, लघु व मध्यम विकास संस्था, एमएसएमई, चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन आणि ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रियल असोसिएशन यांच्या सहकार्याने नॅशनल व्हेंडर डेव्हलपमेंट प्रोग्रॅम-वेंडेक्‍स २०१६ आणि एमएसएमई मंथन २०१६ शुक्रवार (ता.२०) ते रविवारी (ता.२२) पर्यंत येथील गावदेवी मैदानात होणार आहे. सकाळी १० वाजता उद्‌घाटनानंतर सायंकाळपर्यंत सत्रे होतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com