दगडखाणींविषयीचा निर्णय सरकार घेणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

मुंबई - नवी मुंबईतील 60 दगडखाणींविषयीची सुनावणी राष्ट्रीय हरित लवादाने जुलैपर्यंत तहकूब केली आहे. या दगडखाणी सुरू करण्यासाठी आता राज्य सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे.

सरकारने या दगडखाणी सुरू करण्याची परवानगी दिली, तरच मुंबईतील रस्तेदुरुस्तीचा मोठा अडथळा दूर होणार आहे.

करार संपल्यामुळे ठाणे जिल्हाधिऱ्यांनी नवी मुंबईतील 70 हून अधिक दगडखाणी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्या सुरू करण्याबाबत सोमवारी पुणे येथे हरित लवादासमोर सुनावणी झाली. ही सुनावणी जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. त्यामुळे आता सरकारने परवानगी दिल्यास या दगडखाणी तत्काळ सुरू होऊ शकतील, अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी या खाणी का सुरू कराव्यात, याबाबत लेखी कळवण्याची शिफारस मुंबई महापालिकेला केली आहे. त्यापूर्वी पालिकेच्या रस्ते विभाग अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या खाणी सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली होती.

नवी मुंबईतील दगडखाणी बंद झाल्यामुळे मुंबईतील रस्तेदुरुस्ती रखडली आहे. यावर तोडगा काढण्याची मागणी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली होती. त्यामुळे आता राज्य सरकारने वेळीच निर्णय घेऊन तीन-चार दिवसांत या खाणी सुरू न केल्यास पावसाळ्यात शिवसेनेकडून भाजपलाच लक्ष्य केले जाण्याची शक्‍यता आहे.