ठाण्यात मैदानांसाठी धावाधाव सुरू

ठाण्यात मैदानांसाठी धावाधाव सुरू

ठाणे - अर्ज दाखल झाल्यानंतर बंडखोरांचा अपवाद वगळता राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रचाराच्या तारखा अद्याप निश्‍चित झाल्या नसल्या, तरी मैदान आरक्षणासाठी सर्वच राजकीय पक्षांची गडबड सुरू आहे. यापूर्वी सेंट्रल मैदानाचे बुकिंग करण्यासाठी राजकीय पक्षात चढाओढ होती. पण सेंट्रल मैदानावर राजकीय सभा बंद झाल्याने गावदेवी, शिवाजी आणि हायलॅण्ड येथील मैदानांना प्राधान्य दिले जात आहे. सर्व राजकीय पक्ष आपल्या स्टार प्रचारांच्या सभा या मैदानात घेणार आहेत.

ठाणे पालिकेच्या निवडणुकीत यंदा सर्वच राजकीय पक्ष स्वतंत्र लढत आहेत. शिवसेना आणि भाजपचा काडीमोड झाला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीचा सावळागोंधळ अजूनही कायम आहे. मनसेची ‘एकला चलो रे’ची भूमिका कायम आहे. अशा वेळी सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांनी ठाण्यातील प्रचारासाठी आपल्या वरिष्ठ नेत्यांना आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कारण एकाच वेळी मुंबई, ठाणे या महापालिकांसह राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. तसेच जिल्हा परिषदांच्या निवडणुकासुद्धा आहेत. अशा वेळी मोजक्‍याच नेत्यांच्या सभा सर्व महापालिकेतील पक्षांना मिळणार आहे.

राष्ट्रवादीकडून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, धनंजय मुंडे यांच्या सभा होणार आहेत. शिवसेनेकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एक सभा, आदित्य ठाकरे यांचा रोड शो होणार आहे. तसेच शहरातील इतर जिल्ह्यात राहणाऱ्या मतदारांचा विचार करून उत्तर महाराष्ट्राचे गुलाबराव पाटील, कोकणातील दीपक केसरकर, राजन साळवी, भरत गोगावले, मराठवाड्यातील चंद्रकांत खैरे, अर्जुन खोतकर, कोल्हापूरचे राजेश क्षीरसागर, नितीन बानुगडे-पाटील आदी नेत्यांना प्रचाराच्या मैदानात उतरवले जाणार आहे. भाजपकडून फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा होणार आहेत. अद्याप इतर स्टार प्रचारांच्या सभा निश्‍चित झालेल्या नाहीत.

मनसेकडून राज ठाकरे यांच्या सभेसह अमित राज ठाकरे यांचा रोड शो होणार आहे. राज ठाकरे यांची ठाण्यासह दिवा येथे सभा होणार आहे. बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, नारायण राणे, भाई जगताप, कृपाशंकर सिंह, आरिफ नसीम खान यांच्या सभा होणार आहेत. 

यंदा पॅनेल पद्धतीने मतदान होणार असल्याने शहरातील विविध भागात प्रचारसभा घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्राधान्य दिले आहे. एकच मोठी सभा घेत शक्तिप्रदर्शन करण्याऐवजी शहरातील विविध भागात प्रचारमोहिमेचा प्रभाव राहावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

कोण-कोण येणार प्रचाराला?
राष्ट्रवादी - शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, धनजंय मुंडे 
शिवसेना - उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, राजन साळवी, भरत गोगावले, चंद्रकांत खैरे, अर्जुन खोतकर, राजेश क्षीरसागर, नितीन बानुगडे-पाटील
मनसे - राज ठाकरे, अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई  
काँग्रेस - अशोक चव्हाण, नारायण राणे, भाई जगताप, कृपाशंकर सिंह, आरिफ नसीम खान 
भाजप -  देवेंद्र फडणवीस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com