ग्रोथ सेंटर ठरणार विकासाचे इंजिन!

ग्रोथ सेंटर ठरणार विकासाचे इंजिन!

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) काही वर्षांत महानगर क्षेत्रात कल्याण, भिवंडी, वसई-विरार, ग्रेटर पनवेल व पेण-अलिबाग ही पाच ग्रोथ सेंटर्स विकसित केली जाणार आहेत. यातून ठाणे, पालघर व रायगड या तिन्ही जिल्ह्यांमध्ये औद्योगिक विकासाबरोबरच शहरीकरणाला चालना मिळणार आहे.

दक्षिण कोरियन कंपनीने केलेल्या अभ्यासानुसार पाच ग्रोथ सेंटरपैकी कल्याणला प्राधान्य देण्यात आले आहे. मुंबईशी असलेली कनेक्‍टिव्हिटी, मुबलक जमीन व किमान पायाभूत सेवा या आधारावर कल्याण व भिवंडी या दोन ग्रोथ सेंटरचा विकास केला जाणार आहे. कल्याणमधील ग्रोथ सेंटरसाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेतून वगळलेल्या २७ गावांपैकी १० गावांची निवड करण्यात आली आहे. निळजे रेल्वेस्थानकाजवळ १०८९ हेक्‍टर जागा निश्‍चित झाली आहे. राज्य महामार्ग आणि विरार-अलिबाग मल्टी कॉरिडोअर यांची कनेक्‍टिव्हिटी कल्याण ग्रोथ सेंटरसाठी फायदेशीर ठरणार आहे. कल्याण ग्रोथ सेंटरमुळे डोंबिवली, अंबरनाथ व बदलापूर या शहरांच्या विकासाला गती मिळणार आहे. अंबरनाथ व बदलापूरमधील औद्यागिक वसाहतींना ग्रोथ सेंटरमधील सोई-सुविधांचा लाभ मिळणार आहे. मुंबईतील उद्योगांचे महानगरातील स्थलांतराचे उदाहरण सांगायचे, तर गोदरेज ही नामवंत कंपनी आता अंबरनाथमधील एमआयडीसीमध्ये चांगल्या प्रकारे स्थिरावली आहे. ग्रोथ सेंटरचा विकास झाल्यावर या पट्ट्यातील रहिवाशांना ग्रोथ सेंटरमध्ये रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. 

पहिल्या टप्प्यात ३३० हेक्‍टर जागेचा विकास करण्यात येणार आहे. यातील ४४ हेक्‍टर जागा सरकारी मालकीची आहे. ग्रोथ सेंटरमध्ये उद्योगांसाठी आणि परवडणाऱ्या घरांसाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे. भिवंडी परिसरातही स्वतंत्र ग्रोथ सेंटर विकसित केली जाणार आहेत. नव्या भूसंपादन विधेयकानुसार सरकारकडून लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील सर्वांत मोठे यंत्रमाग केंद्र म्हणून भिवंडीची ओळख आहे. ग्रोथ सेंटरच्या माध्यमातून या ठिकाणी ‘लॉजिस्टिक हब’ विकसित करण्याचा एमएमआरडीचा प्रयत्न आहे. अद्ययावत लॉजिस्टिक हबमुळे यंत्रमाग उद्योगाची मालाची साठवणूक आणि दळणवळण यांसंबंधीच्या समस्यांमधून सुटका होणार आहे. 

मेट्रो रेल्वेचा कल्याण-भिवंडीपर्यंत विस्तार, वसई-पनवेल लोकल सेवेचा विस्तार व महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) कल्याण आणि भिवंडीदरम्यान उन्नत मार्ग यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प काही वर्षांत कल्याण-भिवंडीचा चेहरामोहरा बदलतील. १२ वर्षांत कल्याण ग्रोथ सेंटर प्रत्यक्षात आणण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. त्यानंतर भिवंडी, वसई-विरार, ग्रेटर पनवेल व पेण-अलिबाग यांचा टप्प्याटप्याने विकास केला जाईल. रोजगाराबरोबरच मोठ्या लोकसंख्येला सामावून घेण्याची क्षमता या उपनगरांमध्ये आहे. मुंबईचा श्‍वास मोकळा करण्यासाठी महानगर प्रदेशात तयार होणारी पाच ग्रोथ सेंटर्स महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com