आता दप्तरांवर जीएसटीचे ओझे 

आता दप्तरांवर जीएसटीचे ओझे 

ठाणे - शाळा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने शालेय साहित्यांच्या खरेदीसाठी चिमुकल्यांसह पालकांनी बाजारात गर्दी केली आहे; मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही शालेय साहित्याच्या दरामध्ये 10 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसाठी ओझे बनलेल्या दप्तरांना आता वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) ओझे पेलावे लागत असून त्यांचे दर वाढले आहेत. 

नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियांचे सोपस्कर पार पाडल्यानंतर आता मुलांसह पालकांना शालेय साहित्य खरेदीचे वेध लागले आहेत. शाळा काही दिवसांवर येऊन ठेपल्याने वह्या, पुस्तके, कंपास, शालेय कपडे, दप्तर आदी खरेदीसाठी बच्चेकंपनीसह मोठ्यांनी बाजाराकडे पावले वळवली आहेत. अनेक पालक शाळेतून आणलेली लिस्टच दुकानदारांकडे घेऊन येत आहेत; मात्र, वह्यांच्या किमतीमध्ये 10 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. नामांकित कंपन्यांच्या एक नग वहीची किंमत 23 ते 35 रुपये इतकी आहे. त्यामुळे यंदाही पालकांच्या खिशाला वह्या-पुस्तकाच्या खरेदीचा भुर्दंड बसत आहे, तरीही मुलांच्या भविष्यासाठी सजग असणारे आणि मुलांनी काही कमी पडू नये, यासाठी झटणारे पालक 10 ते 15 हजार रुपयांच्या सर्वच्या सर्व शालेय वस्तू खरेदी करूनच बाहेर पडत आहेत, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली. 

यंदा दप्तरांवर जीएसटी लागू झाल्याने त्यांचे दरही वाढले आहेत. कापडावर जीएसटी लागल्याने दप्तर सुमारे 10 ते 20 टक्‍क्‍यांनी महागले आहे. बाजारात दप्तरांची किंमत 250 ते 800 रुपयांवर पोहोचली आहे, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली. दप्तराच्या दरातही वाढ झाली असून काही दिवसांत दर आणखी वाढण्याची शक्‍यता आहे, असे धनश्री बॅगचे मालक पंकज जैन यांनी सांगितले. सध्या मुलांच्या शाळा जवळ आल्याने खरेदीसाठी बाहरे पडलो आहे; मात्र प्रत्येक वस्तू महाग झाली आहे, असे ग्राहक रवी परदेशी यांनी सांगितले. 

सध्या बाजारात पालकांची रीघ लागली आहे; मात्र, वह्या-पुस्तकांचे दर चढेच आहेत. नवनीत या एका वहीची किंमत 30 वरून 35 रुपये झाली आहे. काही इयत्तांचा अभ्यासक्रम बदलला आहे. त्या पुस्तकांच्या दरातही वाढ झाली आहे, तरीही या पुस्तकांची आवक व्यवस्थित आहे. 
- जितेंद्र मोता, मालक, मोता स्टेशनर्स 

चिनी बॅगचा शिरकाव 
दप्तराच्या दरांमध्ये वाढ झाली असल्याने पदपथावर अनेक ठिकाणी दप्तरांची विक्री सुरू आहे. सर्व वस्तूंना गिळंकृत करणाऱ्या चिनी ड्रॅगनने अर्थात चिनी मार्केटने दप्तरांमध्येही शिरकाव केला आहे. पिकाचू, बॅटमॅन, सुपरमॅन यासारखे कार्टून या दप्तरांवर असून ते चिमुकल्यांना आकर्षित करत आहेत. या दप्तरांनाही चांगली मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com