घरातच शस्त्रनिर्मितीचे कारखाने

ATS-Scoud
ATS-Scoud

मुंबई - पुणे आणि नालासोपारा या ठिकाणी दहशतवादीविरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या कारवाईत घातक शस्त्रे बनवण्यासाठी लागणारे सुटे भाग आणि महत्त्वाचे साहित्य जप्त केले. ते स्वत:च शस्त्र बनवत होते. घरातच शस्त्रनिर्मितीचे छोटे-छोटे कारखाने सुरू असल्याचे उघड झाले आहे. वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती मिळाली आहे.

वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांनी दिलेल्या माहितीवरून रविवारी एटीएसने पुणे आणि नालासोपारा येथे छापे मारले. राऊत याने दिलेल्या माहितीवरून पाच देशी बनावटीचे पिस्तूल, तीन अर्धवट पिस्तूल, 9 एमएमची 11 कार्टेज, 7.65 एमएमच्या 30 कार्टेजसह हे पिस्तूल बनवण्यासाठी लागणारे सुटे भाग हस्तगत केले आहेत; तर सुधन्वाच्या चौकशीतून एटीएसने पुणे येथे केलेल्या कारवाईदरम्यान एक लॅपटॉप, पाच हार्डडिस्क, पाच पेनड्राइव्ह, नऊ मोबाईल, अनेक सिमकार्ड, एक वाय-फाय डोंगल, एक कार, एक दुचाकी आणि काही महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचा नकाशा असून पुणे, सातारा आणि नालासोपारा परिसराचा समावेश आहे.

शस्त्रे विकत घेण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याची भीती असल्याने तिघे घरबसल्या ही घातक शस्त्रे बनवत होते. त्यासाठी उत्तर भारतात देशी कट्टे बनवणाऱ्यांचे मार्गदर्शन त्यांनी घेतले. समाजकार्याच्या आडून कट आखणाऱ्यांची माहिती वेळीच पोलिसांना मिळाल्याने हे प्रकरण उघड झाले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यभरात 10 हून अधिक पथके या प्रकरणाच्या तपासाच्या दृष्टिकोनातून कार्यरत आहेत; तर दुसरीकडे नालासोपारा येथील वैभव राऊत निर्दोष असल्याचे सांगून एटीएसने चुकीची कारवाई केल्याच्या निषेधार्थ 17 ऑगस्टला नागरिक मूक मोर्चा काढण्याच्या पवित्र्यात आहेत.

विशेष पथक मुंबईत
बंगळूरमधील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या अमोल काळे याच्याकडून कर्नाटकच्या एटीएसने हस्तगत केलेल्या डायरीत वैभव राऊतचे नाव लिहिलेले आहे. त्यामुळे कर्नाटक एसआयटीचे एक पथक सोमवारी मुंबईत दाखल झाले आहे. या पथकातील अधिकारी गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी या तिघांजवळ करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com