पदपथांवर फेरीवाल्यांचे ठाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

बेलापूर - सीवूड्‌स रेल्वे स्थानकासमोरून डीमार्टकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पदपथांवर फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांची तर गैरसोय होतेच; शिवाय येथील बस थांब्यावरील प्रवाशांनाही बसमध्ये चढता-उतरताना कसरत करावी लागत आहे. येथे खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची वाहने रस्त्यावर उभी असल्याने वाहतुकीत अडथळे येत आहेत. विशेष म्हणजे या प्रकाराकडे बेलापूर विभाग कार्यालयाने दुर्लक्ष केले असल्याने बेकायदा फेरीवाल्यांचे फावले आहे.

नेरूळ विभागाची लोकसंख्या वाढल्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी सीवूड्‌स रेल्वेस्थानक सुरू झाले. यामुळे या परिसरात नागरिक आणि वाहनांची वर्दळ वाढली. त्याबरोबरच फेरीवाल्यांचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे येथील सर्वच पदपथांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. बेलापूर विभाग कार्यालय त्यांच्यावर कारवाई करत नसल्यामुळे येथे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. पालिकेने शहरात पदपथ नागरिकांसाठी बनविले आहेत की फेरीवाल्यांसाठी, असा प्रश्‍न ते विचारत आहेत. सीवूड्‌स रेल्वे स्थानकासमोरून डीमार्टकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्यावरील पदपथांवर फेरीवाल्यांनी ठाण मांडल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागते. या स्त्यावरून एनएमएमटीच्या १८, २०, २२, २७ आणि १०२ क्रमांकाच्या आणि बेस्टची ५०२ क्रमांकाची बस धावते. या रस्त्यावर गुरुकृपा बसस्टॉप आहे. फेरीवाल्यांनी पदपथाबरोबर आता बस स्टॉपवरही अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पादचारी आणि बस प्रवासी दोघांचीही गैरसोय होते. रस्ता अरुंद असल्यामुळे बस स्टॉपवर बस थांबल्यानंतर तेथे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अनेकदा अपघात होतात. सायंकाळी तर येथील परिस्थिती अतिशय बिकट होते. त्यामुळे येथील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

बेलापूर विभाग कार्यालयाने शनिवारी फेरीवाल्यांवर कारवाई केली होती. ते वेळोवेळी कारवाई करतात. याबाबत विभाग अधिकाऱ्यांना वारंवार कारवाई करण्याच्या सूचना देण्यात येतील.

- अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त