मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर अपघाताची चौकशी सुरू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 मे 2017

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरच्या अपघात प्रकरणाची नागरी उड्डाण संचालनालयामार्फत (डीजीसीए) चौकशी सुरू करण्यात आली आहे.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरच्या अपघात प्रकरणाची नागरी उड्डाण संचालनालयामार्फत (डीजीसीए) चौकशी सुरू करण्यात आली आहे.

लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला निलंगा येथे गुरुवारी अपघात झाला. या अपघातातून मुख्यमंत्री थोडक्‍यात बचावले. हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे पायलटने हेलिकॉप्टर खाली घेण्याचा प्रयत्न केला. मात्र वीजेच्या तारेला अडकल्याने 18 ते 20 फुटांवरून हेलिकॉप्टर खाली कोसळले. सुदैवाने यात मुख्यमंत्र्यांना काहीही झाले नाही. दरम्यान डीजीसीएमार्फत या अपघाताची चौकशी सुरू झाली आहे.

डीजीसीएच्या महासंचालकांनी विमानाचे पायलट, को पायलट आणि इंजिनिअर्स यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. डीजीसीएच्या कार्यालयातच ही चौकशी होणार आहे. लॅंडिंगसाठीची जागा योग्य होती का? वैमानिकांनी हेलिपॅडची पाहणी केली होती का? डीजीसीएचे हेलिपॅडबाबतचे नियम पाळले गेले का? उड्डाण करताना हवमानाचा अहवाल घेतला होता का? हेलिकॉप्टरची तांत्रिक चाचणी केली होती का? यासह अन्य काही बाबींची चौकशी करण्यात येणार आहे.