अश्‍लील संदेशांविरोधातील हेल्पलाईन आजपासून 

अश्‍लील संदेशांविरोधातील हेल्पलाईन आजपासून 

मुंबई - सोशल मीडियाचा गैरवापर करून महिलांना मानसिक त्रास देणाऱ्यांविरोधात नाना चुडासामा आय लव्ह मुंबई कमिटीच्या वतीने मंगळवारी (ता. 7) प्रेस क्‍लब येथे टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. सकाळ माध्यम समूह आणि भाजपच्या प्रवक्‍त्या शायना एन. सी. यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. 

महिलांना अश्‍लील, असभ्य संदेश पाठवणारे, त्यांची बदनामी करणारे आणि त्यांना सतावणाऱ्यांविरोधात पोलिसांच्या सायबर क्राईम सेलकडे तक्रार करण्यासाठी हा टोल फ्री क्रमांक मदतीचा ठरणार आहे. 

भाजपच्या नेत्या शायना एन. सी. यांना भाजपच्या वाराणसी येथील एका नेत्याने व्हॉटस ऍपवर अश्‍लील संदेश पाठवले होते. सुमारे 500 संदेश आल्यानंतर शायना यांनी तक्रार नोंदवली. सर्वसामान्य महिलांच्या बाबतीत असे प्रकार घडत असतात; मात्र त्याविरोधात उभे राहण्याचे धैर्य त्यांच्यात नसते. त्या तक्रारही करत नाहीत. त्यामुळे अशा मनोवृत्तींच्या विकृतांना बळ मिळते. महिलांनी पुढे यावे आणि निर्भयपणे तक्रार करावी, यासाठी हेल्पलाईन सुरू करण्याचा निर्णय शायना यांनी घेतला. सकाळ माध्यम समूहानेही शायना यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहण्याचे ठरवले आहे. टोल फ्री हेल्पलाईनच्या क्रमांकाच्या माध्यमातून महिलांना अनेक प्रकरणांमध्ये मदत करण्यात येईल. त्यासाठी मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र पोलिसांचीही मदत घेण्यात येईल. 

सोशल मीडियावर अनेकदा अनोळखी व्यक्तींचे अश्‍लील संदेश येतात. अशा वेळी संदेश पाठवणाऱ्या विकृतीविरोधात तुम्ही बिनधास्त तक्रार करा. काय होईल याचा विचार करून घाबरून गप्प राहू नका. बिनधास्त पुढे या. पोलिस सर्वांसाठी आहेत. एका महिलेने हिंमत दाखवली तर इतर महिलांना प्रेरणा मिळते. मलाही सुरुवातीला भीती वाटली होती; पण अनेकांनी आधार दिला, असे शायना एन. सी. यांनी सांगितले. 

"सकाळ'चे आवाहन 
महिलांवर होणारे अत्याचार, गैरप्रकार किडलेली पुरुषी मानसिकता दाखवतात. या दूषणातून अनेक पुरुष मुक्त होऊ पाहत आहेत; पण असे प्रकार करणे भूषणावह वाटणारेही अनेक आहेत. त्यांचे वागणे बदलण्यासाठी, त्यांना शहाणे करण्यासाठी "सकाळ'ने पाऊल उचलले आहे. त्यासाठी गरज आहे आपण सर्वांनी जागरूक होण्याची. असे गैरप्रकार तुमच्या लक्षात आल्यास त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. महिलांनो, अत्याचार सहन करू नका. त्याविरोधात आवाज उठवा. आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यासाठी व्हॉट्‌स ऍप क्रमांक ः 8888809306.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com