महापालिका उभारणार कोंबड्यांचा कत्तलखाना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

मुंबई - देवनार येथील पशुवधगृह बंद करण्याची मागणी होत असताना महापालिकेने खास कोंबड्यांसाठी कत्तलखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रस्तावित विकास आराखड्यात शहराच्या हद्दीजवळ भूखंड आरक्षित करण्यात येणार आहे.

मुंबई - देवनार येथील पशुवधगृह बंद करण्याची मागणी होत असताना महापालिकेने खास कोंबड्यांसाठी कत्तलखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रस्तावित विकास आराखड्यात शहराच्या हद्दीजवळ भूखंड आरक्षित करण्यात येणार आहे.

मुंबईत दिवसाला सरासरी तीन ते चार लाख कोंबड्यांची विक्री होते. रविवारी हा आकडा पाच लाखावर जातो. मात्र, या कोंबड्यांची वैद्यकीय तपासणी केली जात नाही. त्यामुळे स्वाईन फ्ल्यूसारखे आजार फैलावण्याची भीती असते. तसेच चिकनविक्रीच्या दुकानात स्वच्छताही राखली जात नाही. कोबड्यांची पिसे आणि टाकाऊ अवयव उघड्यावर फेकले जातात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होतो. मुंबईत विक्रीसाठी येणाऱ्या कोंबड्याची पशुवधगृहात तपासणी केल्यानंतर त्यांची तेथेच कत्तल केल्यास संसर्गजन्य आजारांना प्रतिबंध होईल. तसेच कचऱ्याचा प्रश्‍नही सुटेल. तशी सोय देवनार पशुवध गृहात देण्याची सूचना सभागृहनेत्या तृष्णा विश्‍वासराव यांनी मांडली होती.

या सूचनेची प्रशासनाने दखल घेतली आहे. कोंबड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने कत्तल करून त्यांचे मांस शहरात पुरविण्यासाठी शहराच्या हद्दीजवळ कत्तल खान्यासाठी भूखंड आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विकास आराखड्यातही तसा प्रस्ताव आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. जकात रद्द झाल्यानंतर जकातनाक्‍यांचे मोठे भूखंड रिक्त होणार आहेत. ते पशुवधगृहासाठी आरक्षित करता येतील. पशुवधगृहाची जागा अपुरी असल्याने कोंबड्यांसाठी कत्तलखाना सुरू करण्याचा विचार पालिका करत आहे.

देवनार पशुवधगृहातील कत्तल
- तीन हजार शेळ्या
- 250 म्हशी
- 250 डुक्कर
- ईदच्या काळात अडीच ते तीन लाख शेळ्या-मेंढ्यांची कत्तल

मुंबईतील चिकनविक्री
- दिवसाला सरासरी तीन ते चार लाख कोंबड्यांची विक्री
- रविवारी पाच ते सहा लाख कोंबड्यांची विक्री

कोंबड्यांचा कत्तलखाना कशासाठी
- कोंबड्यांची वैद्यकीय तपासणी होणार
- शास्त्रोक्त पद्धतीने कत्तल
- तपासलेले, स्वच्छ चिकन मिळणार
- पिसे, टाकाऊ अवयवांवर प्रक्रिया