वादात अडकली महामार्गाची दुरुस्ती 

वादात अडकली महामार्गाची दुरुस्ती 

नवी मुंबई - देशातील अग्रगण्य व नामांकित सरकारी संस्थांमध्ये सुरू असलेल्या वादाचा फटका मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाला बसला आहे. या महामार्गावरची दुरुस्ती करण्यास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) सहकार्य करत नाही, असे सांगत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (न्हाई) तक्रारकर्त्याकडे हतबलता व्यक्त केली आहे. वाशीतील सामाजिक कार्यकर्ते भरत सामंत यांनी राष्ट्रीय व राज्य महामार्गांच्या दुरवस्थेबाबत संबंधित यंत्रणांकडे पत्रव्यवहार केला होता. त्यात सरकारी संस्थांनी कारणे पुढे करून हतबलता व्यक्त केली. 

भरत सामंत यांना त्यांच्या व्यवसायासाठी अनेकदा राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरून प्रवास करावा लागतो. या काळात त्यांना महाराष्ट्र वगळता इतर राज्यांत चांगले महामार्ग असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रार केली होती. सायन-पनवेल व मुंबई-गोवा महामार्गासाठी त्यांनी सार्वजनिक बांधकाम व रस्ते विकास महामंडळाकडेही तक्रार केली होती. परंतु या समस्या सोडवण्याऐवजी सर्व आस्थापनांनी त्यांची रडगाणी सामंत यांच्याकडे ई-मेल व पत्राने मांडली. यावर तोडगा निघावा यासाठी सामंतांनी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे सर्व तक्रारी पाठवल्या होत्या. या प्रकरणाला वाचा फोडणारी बातमी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर महामार्ग प्राधिकरण व एमएसआरडी यांनी एकमेकांकडे बोटे दाखवण्यास सुरुवात केली आहे. मुंबई-बंगळुरू महामार्गाचे रखडलेले दुरुस्तीचे काम आपल्यामुळे रखडले नसून रस्ते विकास महामंडळामुळे रखडले असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (न्हाई) सामंत यांना ई-मेलवरून दिली आहे. रस्ते विकास महामंडळ आम्हाला महामार्गाच्या दुरुस्तीत येणाऱ्या अडचणी सोडवण्यात सहकार्य करत नसल्याचे न्हाईने सामंत यांना कळवले आहे. 

सहापदरीकरणाचे काम गुंडाळले 

मुंबई-बंगळुरू महामार्गावर सातारा ते कागलदरम्यानचे काम काही वर्षांपासून थांबले आहे. हा मार्ग सहापदरी करण्याचे कामही बासनात गुंडाळले आहे; तर या मार्गावरील दोन उड्डाणपुलांचे कामही दहा वर्षांपासून बंद आहे. शिवाय बांधकामांचे साहित्य रस्त्यातच पडले असल्याने रात्री अपघात होण्याची शक्‍यता आहे. कर्नाटकातून महाराष्ट्रात आल्यानंतर रस्त्यालगतची हिरवळही करपून गेल्याची तक्रार सामंत यांनी केली होती. 

कर्नाटकात वाहनाने प्रवास करताना फार आरामदायक वाटते. त्यामुळे टोलनाक्‍यांवर पैसे देताना वाईट वाटत नाही. परंतु कर्नाटकातून महाराष्ट्रात आल्यावर खराब व निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे टोलनाक्‍यांवर पैसे देण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे मी महामार्गाशी संबंधित संस्थांकडे तक्रारी केल्या होत्या. 
- भरत सामंत, सामाजिक कार्यकर्ते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com