महामार्ग ओलांडण्यासाठी वन्यजीवांना हवा पूल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

10 वर्षांत "हायवे'ने घेतले 44 बिबट्यांचे बळी!

10 वर्षांत "हायवे'ने घेतले 44 बिबट्यांचे बळी!
मुंबई - अहमदाबाद महामार्गावर वसईनजीक एका वाहनाच्या धडकेत नुकताच एका बिबट्याचा मृत्यू झाला. या अपघातामुळे मुंबईनजीक महामार्गावर गेल्या 10 वर्षांत मृत्युमुखी पडलेल्या बिबट्यांची संख्या 44 वर पोहोचली आहे. महामार्गावर दरवर्षी होणारा बिबट्याचा मृत्यू थांबवण्यासाठी महामार्गानजीक वन्यजीवांना रस्ता ओलांडण्याकरता पूल उभारावा, अशी मागणी वन्यजीव तज्ज्ञांकडून होत आहे.

मुंबई-अहमदाबाद द्रुतगती महामार्गावजवळ नुकताच पाच वर्षांचा बिबट्या मृतावस्थेत आढळला. वसईनजीकच्या सातीवलीजवळ हा प्रकार घडला. द्रुतगती महामार्गावर घडलेला हा पहिलाच प्रकार आहे; मात्र दरवर्षी एकदोन बिबट्यांचा मृत्यू होत आहे. रस्ता ओलांडताना बिबट्यांच्या मृत्यूबाबत "मुंबईकर्स फॉर एसजीएनपी' या प्राणीप्रेमी संस्थेने 2014 मध्ये सर्वेक्षण केले. त्यानुसार 1994 ते 2001 पर्यंत 40 बिबट्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. यातील बहुतेक मृत्यू तुंगारेश्‍वर अभयारण्यानजीक वसई आणि घोडबंदर मार्गावर झाले आहेत. तीन वर्षांत तीन बिबट्यांचा मृत्यू झाला. द्रुतगती महामार्गावर वाहनांचा वेग अधिक असल्याने रस्ता ओलांडताना बिबट्यांना वाहनांची धडक बसते. मुंबई-अहमदनगर येथील चार ठिकाणे बिबट्यासाठी मृत्यूमार्ग ठरल्याचे दिसते. तरीही महामार्गावर प्रत्येक ठिकाणी वेग आवरण्याचे फलक नसल्याने प्राणीप्रेमींनी नाराजी व्यक्त केली.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्‍वर अभयारण्य ओलांडून जाण्याकरता वन्यजीवांसाठी पूल नसल्याने हा मार्ग त्यांच्यासाठी मृत्यूचा सापळा ठरला आहे. त्यामुळे बिबट्यांची संख्या आणखी कमी होईल, अशी भीती "फॉरेस्ट ऍण्ड कॉन्झर्वेशन सेंटर'चे संस्थापक कृष्णा तिवारी यांनी व्यक्त केली. पाच वर्षांत बिबट्यांची संख्या कमी होण्यास द्रुतगती महामार्गावरील अपघात कारणीभूत ठरतील असेही ते म्हणाले.

वन्यजीवांसाठी रस्त्यावरून किंवा रस्त्याखालून जाणारा पूल उभारला गेला, तर त्यांच्या मृत्यूची संख्या कमी होईल. परदेशात द्रुतगती महामार्गावर अशा पद्धतीचे पूल उभारण्यात आले आहेत. त्यामुळे वन्यजीव संवर्धनाला मदत झाली.
- डॉ. विद्या अत्रेय, वन्यजीव जीवशास्त्रज्ञ
 

Web Title: Highway crossing for wildlife air pool