चौपदरीकरणाच्या कामांमुळे महामार्गा धोक्याचा,पावसाळ्यात खबरदारी नाही

a.jpg
a.jpg

महाड : मुंबई गोवा महामार्गाचे इंदापूर ते कशेडी दरम्यान चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरु असुन यासाठी माती भराव, डोंगर उत्खनन व इतर कामे करण्यात आलेली आहेत. परंतु काम करणा-या कंपनीने पावसाळ्यात आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने महामार्गावर दरड कोसळण्याची व अपघात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पहिल्या पावसातच भरावाची माती रस्त्यावर आल्याने वाहन चालकांना चिखल व पाण्यातूनही प्रवास करावा लागला.

वडपाले त कशेडी या दरम्यानचे काम एल अँड टि या कंपनीने घेतलेले आहे. महामार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाढीव रस्त्यावर मातीचा भराव करण्यात आलेला आहे. मो-यांची कामे करण्यासाठी खोदाई तसेच पाईप टाकून ठेवलेले आहेत. भरावासाठी लागणारी माती महामार्गालगत असलेल्या डोंगरातून काढलेली आहे तर काही ठिकाणी डोंगर, टेकड्या रुंदीकरणासाठी तोडल्या जात आहेत. पावसाळ्यापूर्वी कामाचा आवश्यक तो उरक न झाल्याने पावसाळ्यात या महामार्गावरील प्रवास जिकरीचा झाला आहे. पहिल्या पावसातच अनेकांना याचा प्रत्यय आला. धोकादायक व रस्त्यालगतचे डोंगर पावसाळ्यानंतर फोडणे गरजेचे होते तसे न झाल्याने या ठिकाणी दरड कोसळू शकतात. दासगाव, वहूर, गांधारपाले, नडगाव, चांढवे, पारले, या परिसरात माती रस्त्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. माती रस्त्यावर घसरु नये यासाठी रेती भरलेल्या गोणींचे पिचिंग करणे, धोकादायक ठिकाणी पत्रे लावणे, फलक लावणे, पाण्याचा निचरा होऊ देणे अशा उपाययोजना गरजेच्या असतानाही त्या पूर्णपणे केल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे भरावाची माती रस्त्यावर येत आहे, मो-यातील पाणी व माती शेतात जात आहे असे अनेक त्रास वाहनचालक व शेतक-यांना होत आहेत.

चौपदरीकरणाच्या कामांमुळे महामार्गावर अपघातचा धोका वाढू शकतो हे गृहित धरुन महाड महामार्ग पोलिस विभागाने राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच चौपदराकणाचे काम करणा-या कंपनीला खबरदारीच्या उपाययोजना केल्या जाव्यात अशा सुचना केल्या होत्या परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले. 


-रेती भरलेल्या गोणींचे पिचिंग सर्व ठिकणी नाही
-पाण्याचा निचरा नाही 
-डोंगर खोदाईमुळे धोका
-शेतात पाणी जाऊन नुकसान
-धोकादायक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था, नामफलक नाहीत
-नडगाव येथे 1994 साली दरड कोसळून दोन वाहने वाहून गेली होती. तेथेच डोंगर खोदाई झाल्याने  धोका
-दासगाव खिंड,केंबुर्ली येथेही धोका
-वीजेचे खांबही धोकादायक
-पोलादपूरात चिखल
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com