हिंदू राष्ट्रासाठी राष्ट्रपतिपदी भागवतच हवेत - उद्धव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

मुंबई - हिंदू राष्ट्र म्हणून आपण पुढे जात आहोत. समान नागरी कायदा लागू करण्याबरोबरच अनेक स्वप्ने पूर्ण करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासारखे कणखर नेते राष्ट्रपतिपदी असतील, तर ते सहज शक्‍य होईल. त्यामुळे त्यांचे नाव मनापासून सुचवले होते, असे सांगत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरसंघचालकांचे नाव पुन्हा चर्चेत आणण्याचा मंगळवारी प्रयत्न केला.

"अनेक पदांवर संघाचे कार्यकर्ते आहेत. राज्यपालही आहेत. त्यामुळे भागवत यांनी देशाचे नेतृत्व करायला काय हरकत आहे, अशा शब्दांत उद्धव यांनी या मागणीचे समर्थन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवले, तर राष्ट्रपतिपदाची निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

त्याबाबत उद्धव यांना विचारले असता 'शरद पवारांचे म्हणाल तर ते मोदींचे गुरू आहेत. त्यांना पद्मविभूषण देण्यात आले आहे. त्यामुळे कुणाच्या मनात काय येईल आणि काय होईल, हे मला सांगता येत नाही,'' अशा शब्दात त्यांनी भाजपला टपली मारली. एकमेकांची मने जाणून घ्यायला तेवढी जवळीक लागते, असा चिमटाही त्यांनी काढला.

दोघांनाही शुभेच्छा
कॉंग्रेसचे नेते नारायण राणे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याबाबत ठाकरे यांना विचारले असता, त्या दोघांनाही माझ्या शुभेच्छा, असे ते म्हणाले.

Web Title: For the Hindu Nation, the President must bhagwat