हिंदुजा कॉलेजच्या मुलांची गरीब मुलांबरोबर दिवाळी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

फटाक्‍यांचे दुष्परिणाम लक्षात घेत चेंबूरच्या स्वामी मुक्तानंद शाळेच्या विद्यार्थ्यांनी फटाके न घेता त्या पैशांनी दिवाळी अंक विकत घेतले. या शाळेतर्फे तीन वर्षे विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले जात आहे. या उपक्रमाला विद्यार्थी चांगला प्रतिसाद देत आहेत

मुंबई - केपीबी हिंदुजा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त गरीब व अनाथ मुलांसोबत एक दिवस घालवून त्यांच्या जीवनात आनंद फुलवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे यासाठी विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांच्याकडून स्वेच्छेने निधी गोळा करण्यात आला.

या महाविद्यालयातील एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी या मुलांना भेटवस्तू, शालेय साहित्य, पांघरुण, खाऊ दिलाच; पण त्यांच्यासोबत गाणी म्हणून, खेळ खेळून मौजमजाही केली. वांद्रे ईस्ट कम्युनिटीतर्फे वांद्रे येथे गरीब, अनाथ मुलांसाठी केंद्र चालविले जाते. तेथे या विद्यार्थ्यांनी भेट दिली. तेथील मुलांसाठी मातीपासून खेळणी बनवण्याची स्पर्धा, मेंदी काढण्याची स्पर्धा घेतली. या वेळी मुलांना आकर्षक बक्षिसेही देण्यात आली. ही मुले केवळ गुण मिळविण्यासाठी असे उपक्रम करीत नाहीत, तर या मुलांना आनंद देण्याच्या हेतूने हे प्रयत्न करतात, असे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मिनू मधलानी यांनी सांगितले.

फटाक्‍यांऐवजी पुस्तकखरेदी
फटाक्‍यांचे दुष्परिणाम लक्षात घेत चेंबूरच्या स्वामी मुक्तानंद शाळेच्या विद्यार्थ्यांनी फटाके न घेता त्या पैशांनी दिवाळी अंक विकत घेतले. या शाळेतर्फे तीन वर्षे विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले जात आहे. या उपक्रमाला विद्यार्थी चांगला प्रतिसाद देत आहेत. शाळेत प्रदूषणाची माहिती अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना मिळत असते. फटाक्‍यांमुळे वायूप्रदूषण, ध्वनिप्रदूषण, कचरानिर्मिती व पैशांचा अपव्यय हे तोटे होतात. या सर्वांचा जास्त त्रास लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्ती तसेच मुक्‍या प्राण्यांना होतो. त्यामुळे विद्यार्थी फटाक्‍यांऐवजी दिवाळी अंक विकत घेतात, सुटीनंतर कोणता अंक आवडला यावर त्यांची चर्चा होते, तसेच त्यावर निबंध स्पर्धाही घेतल्या जातात.

समाजसेवेसाठी कंदीलविक्री
अंधेरीचे साईसिद्धी कला केंद्र व श्री साई ढोल ताशा पथक यांच्या सुमारे 15 कार्यकर्त्यांनी आकाशकंदील तयार करून त्याच्या विक्रीतून येणारी रक्कम सामाजिक संघटनांना देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीही या कार्यकर्त्यांनी दिवाळीत असेच निधीसंकलन करून जमा झालेले वीस हजार रुपये नाना पाटेकर यांच्या "नाम फाऊंडेशन'ला दिले होते. अक्षय चव्हाण, राजेश सकपाळ, दिनेश सावंत, समीर सावंत हे कार्यकर्ते किमान पाचशे कंदील तयार करतात.

Web Title: hinduja college students celebrate diwali with poor kids